एसटी कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी संयुक्त कृती समितीचा श्रीरामपुरात मोर्चा

एसटी कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी संयुक्त कृती समितीचा श्रीरामपुरात मोर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी श्रीरामपूर संयुक्त कृति समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू केलेले होते. परंतु सरकारने सदरच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने कामगारांनी उपोषणाचे रुपांतर मोर्चात केले. शहरातील श्रीरामपूर आगारपासून मोर्चाला सुरुवात होऊन मेनरोड- शिवाजी रोड मार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

शासनाच्या नाकर्तेपणामुळे कामगार, कष्टकरी व सर्व सामान्य जनतेचे जीवनमान खालावले आहे. राष्ट्रीय परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांना शासनाच्या इतर विभागाच्या तुलनेत सर्वात कमी तुटपुंजे वेतन देवून एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांवर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय केला गेला आहे. एसटी महामंडळातील कामगारांना महामंडळ सध्या देत असलेल्या पगारातून त्यांच्या नित्याच्या मूलभूत गरजा सुध्दा भागविणे कठीण झाले आहे. मुलाबाळांचा खर्च सुध्दा ते या पगारातून करु शकत नाही हे एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. एसटी महामंडळाचे जवळपास 90 टक्के कर्मचारी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेलेले आहेत. कामगारांमध्ये असंतोष निर्माण होवून महाराष्ट्रात जवळपास 35 कामगारांनी आत्महत्येसारखे गंभीर पावले उचलली आहेत.

या कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी कालशनिवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाचे महात्मा गांधी पुतळा, मेनरोड येथे सभेत रुपांतर झाले. यावेळी कामगार नेते नागेश सावंत, भाजपाचे प्रकाश चित्ते, तृतियपंथीयांच्या नेत्या दिशा पिंकी शेख, लाल निशाण पक्षाचे कॉम्रेड जीवन सुरुडे, मनसेचे बाबा शिंदे, छावाचे नितीन पटारे, बहुजन वंचितचे चरण त्रिभुवन, मराठा स्वयंसेवक संघाचे राजेंद्र भोसले, देवीदास कहाणे, विष्णू गर्जे, सुरेश चांदणे, प्रशांत लिहीणार, मुन्ना शेख, अमोल पठारे, गणेश पुजारी, उमाताई बर्डे, ताहेरा तांबोळी आदींची भाषणे झाली. यावेळी नायब तहसिलदार ज्योती गुंजाळ यांना एसटी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी ताराचंद अलगुड्डे, नजीर शेख, जर्नादन भवर, सुनील इंगळे, सलीम शेख, नगरसेवक किरण लुणिया, संजय पांडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी आ. लहु कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, आरपीआयचे विजय पवार, भाजपाचे मारुती बिंगले, हिंदू एकताचे सुदर्शन शितोळे, भीम शक्तीचे संदीप मगर, संघर्ष समितीचे अशोक राऊत, भारतीय लहुजी सेनेचे हानिफ पठाण, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल आदी उपस्थित होते. यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com