बियाणे, खतांचा पुरवठा मुबलक व्हावा, स्वयंचलित हवामान केंद्र वाढवावे

बियाणे, खतांचा पुरवठा मुबलक व्हावा, स्वयंचलित हवामान केंद्र वाढवावे

आमदार आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) - कोपरगाव विधानसभा मतदार संघात चालू खरीप हंगामात 21 हजार 500 हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे राहण्याचा अंदाज असून त्याप्रमाणात जास्तीत जास्त सोयाबीन बियाणांचा व खतांचा पुरवठा व्हावा तसेच मागणीप्रमाणे स्वयंचलीत हवामान केंद्र वाढवावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे खरीप आढावा बैठकीत केली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्याची खरीप आढावा बैठक पार पडली. बैठकीत सहभागी होत आ.काळे यांनी खरीप हंगामात शेतकर्‍यांना येणार्‍या बियाणे, खतांच्या टंचाईकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधत स्वयंचलीत हवामान केंद्राची संख्या वाढविण्याबाबत आग्रह धरला. ते म्हणाले, सोयाबीनला मिळालेला उंचाकी दर यामुळे सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे. मात्र मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान त्यामुळे सोयाबीन बियाण्याची साठेबाजी होऊन कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकर्‍यांना सोयाबीन बियाणे वाढीव दराने खरेदी करण्याची वेळ येऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्‍यांना रासायनिक खते वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पेरणीचा हंगाम वाया जाऊन शेतकर्‍यांचे नुकसान होते.

त्यासाठी बियाण्यांप्रमाणे खते देखील शेतकर्‍यांना वेळेत मिळावी. तालुक्यात असलेल्या महसूल मंडलातील स्वयंचलीत हवामान केंद्रावर होणार्‍या पावसाच्या नोंदीवरून नुकसानभरपाईचे निकष ठरले जातात. महसूल मंडलात प्रत्येकी एकच स्वयंचलीत हवामान केंद्र आहे. एका गावात पाऊस पडला तरी तो संपूर्ण मंडलात पडतोच असे नाही. एकच स्वयंचलीत हवामान केंद्र असल्यामुळे झालेल्या पर्जन्यमानाची अचूक आकडेवारी त्या स्वयंचलीत हवामान केंद्रात नोंदविली जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रत्यक्षात नुकसान होऊन देखील नुकसानीची मदत मिळण्यासाठी पात्र असताना देखील शासनाकडून मिळणार्‍या नुकसानभरपाई पासून तसेच हवामान आधारित पीकविमा व दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहत आहे. त्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मंडलात स्वयंचलीत हवामान केंद्राची संख्या वाढविण्याची मागणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com