पुरवठा विभागाविरोधात स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार
सार्वमत

पुरवठा विभागाविरोधात स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार

चौकशी करून कारवाई करण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे आश्वासन

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर पुरवठा विभागाकडून चुकीच्या पध्दतीने कारवाई होत आहे. या विरोधात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथे भेट घेऊन निवेदन दिले.

याप्रकरणी सखोल चौकशी करून दुकानदारांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निवेदनाची दखल घेऊन, चौकशी करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी दिली.

जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर लॉकडाऊन काळात लाभार्थ्यांची तक्रार नसताना कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकाने सील करण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या मंजूर नियतनांपैकी गोदामातून प्रत्येक गोणीमध्ये 2 ते 3 किलो धान्य कमी येते.

किरकोळ 2 ते 3 किलो धान्य साठा कमी आढळ्याचे कारण पुढे करून कोणतीही पूर्वसूचना न देता कपुरवठा विभागाच्या वतीने संबंधित दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये काही विशिष्ट दुकानदारांना टार्गेट करण्यात आले आहे. त्यांच्या दुकानांचे परवाने निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणात शेवगाव तालुका पुरवठा निरीक्षक पवनसिंग बिगोत यांनी दुकानाबाबत चुकीचा अहवाल देऊन जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या आदेशान्वये कार्यवाही करण्याचा धडाका सुरू ठेवला. ज्या व्यक्तींचा स्वस्त धान्य दुकानांशी संबंध नाही, स्वस्त धान्य दुकानांबाबत कायदेशीर कागदपत्रे नाहीत, अशांच्या नावे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बाब गंभीर स्वरूपाची असून झालेली कारवाई एकतर्फी व चुकीची असल्याचा स्वस्त धान्य दुकानदारांचा आरोप आहे. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी कळकुंभे, मनीषा साळवे, प्रकाश होनाजी, ओमप्रकाश कवडे, रंजना सुतार, सिंधुबाई अल्हाट, लक्ष्मण धूत, प्रवीण नाईक, डी. बी. बिहाणी आदी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात नगर शहरातील शिवभोजन केंद्रात घोटाळा झाल्याच्या तक्रारी झाल्या. मात्र, त्यावर पुरवठा विभागाने कोणतीच चौकशी केलेली नाही. यामुळे झालेल्या तक्रारी निरर्थक की पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले, याची माहिती मिळू शकली नाही. नगर शहरात लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र बंद असताना शहरातील शिवभोजन केंद्रातून हजारो थाळ्या कोणी फस्त केल्या याची चौकशी गरजेची झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com