सुपा |वार्ताहर| Supa

सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने विकसित होत असलेल्या या परिसरात वाघुंडे, आपधूप, बाबुर्डी, पळवे आदी शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत.

औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यामागे त्याचा मुख्य उद्देश स्थानिकांची आर्थिक उन्नती करणे हा आहे. हा त्यामागील हेतू असतो. यासाठी शेतकर्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जातात. तेथील विकास कामांवर स्थानिकांचा अधिकार असतो परंतु दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणा, राजकीय यंत्रणा, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी स्थानिकांचा अधिकार गमावतात. मात्र ओल्या पार्ट्या देणार्यांना लेबर कॉन्ट्रॅक्ट, बांधकामाचे ठेके, साहित्य पुरवण्याचे कामे दिली जातात, असा आरोप हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केला.

पारनेर तालुक्यातील सुपा परीसरातील म्हसणे फाटा येथील नव्याने सुरू झालेल्या मायडीया व कॅरीअर कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्त व स्थानिक भुमिपुत्रांना नोकर्या तसेच कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या मागणासाठी वाघुुंडे येथील चार तरुणांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण तिसर्या दिवशी सुरूच होते.

दरम्यान विविध संघटनांनी उपोषण स्थळी जाऊन जाहीर पाठिंबा दर्शविला यामध्ये हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, पारनेर तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे आदींनी उपोषणस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.

ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नोकर्या तसेच कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावे, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून करीत आहेत. यापूर्वी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर मार्ग काढण्याचे अश्वासन देण्यात आले, मात्र तरुणांच्या हाती काहीही पडले नाही. या कंपन्यांमध्ये सर्व कॉन्ट्रक्ट पुणे येथील ठेकेदारांना देण्यात आले असून नोकर्यांमध्येही बाहेरच्याच तरुणांना घेण्यात आले असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

उपोषण सुरू झाल्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. तुमचे आंदोलनच बेकायदेशीर आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल करू, कंपनीवर दगडफेक केल्याचे गुन्हे दाखल करू अशा प्रकारची भीती घालण्यात आली. मात्र त्यास आंदोलकांनी जुमानले नाही. मंगळवारी दुपारी तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मायडीया, कॅरिअरचे प्रोजेक्ट हेड यादव हे देखील तेथे उपस्थित होते.

कंपनीमध्ये 80 टक्के स्थानिक तरुणांना संधी देण्यात आल्याचा दावा यादव यांनी केला. स्थानिक याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण जो तेथे वास्तव्यास आहे, असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. या कंपन्यांमध्ये स्थानिकांना कॉन्ट्रॅक्ट देण्याचे काहीच कारण नाही, असे ठामपणे सांगत यादव यांनी पुण्याच्या ठेकेदारांचीच तळी उचलली.

आमच्या जमिनी घेतल्या. त्यावर उभ्या राहिलेल्या कंपन्यांमधील एखादे तरी कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळावे, अशी माफक अपेक्षा या तरुणांची आहे. परंतु कंपनी व्यवस्थापन प्रशासनास हाताशी धरून तरुणांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आंदोलनात अविनाश गाडीलकर, अशोक गाडीलकर, विनायक रासकर, प्रमोद गाडीलकर, संतोष गाडीलकर हे सहभागी झाले आहे.