
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
सुपा येथील श्रीराम ज्वेलर्स या सराफी दुकानात चार महिलांनी मंगळवारी (दि.18) भर दुपारी दागिन्यांची चोरी करून पलायन केले. हे लक्षात येताच दुकानदाराने आरडाओरड करताच नागरिकांनी पाठलाग करून दोघींना पकडले असून दोघी चारचाकी वाहनातून पळून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्याचे उपसरपंच सागर मैड व अमोल मैड यांचे सुपा बाजारतळ परिसरात श्रीराम ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान अमोल मैड जेवणासाठी वरील मजल्यावर गेले असता दुकानात त्याची आई दुकान सांभाळत होती. दुकानात महिला असल्याचे पाहून चार महिला दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. त्याचवेळी त्या महिलांनी चारचाकी कार बाजारतळावर सुपा-पारनेर रोडवर सज्ज ठेवली होती.
दुकानात दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने या महिलांनी अनेक दागिने पाहिले, सतत जास्त बोलणे व प्रत्येकाने वेगवेगळे विचारून गोधळ निर्माण केला. या गडबडीत या महिलांनी काही दागिने चोरले व काहीतरी कारण सांगत खरेदी न करताना दुकानातून पळ काढाला, दरम्यान काही दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर सागर मैड यांच्या आईने आरडाओरडा केला असता नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. यातील दोघी चोर महिला पळत जाऊन चारचाकी कारमध्ये बसून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. यावेळी कारचालकाने गडबडीत दोघा जणांना धडक दिली. तर एक चोर महिलेला जागेवरच पकडले तर एक चोर महिला वृद्ध असल्याने कारमध्ये पटकन जाऊन बसता न आल्याने तेथील नागरिकांनी व महिलांनीही पकडून दुकानात बसवत चोप दिला.
चोरीची माहिती कळल्यावर सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ओहळ, भिमाबाई रेपाळे, यशवंत ठोबरे हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पकडलेल्या दोन्ही चोर महिलाना ताब्यात घेतले. दरम्यान पकडलेल्या दोन महिला व इतर दोन साथीदार, कारचालक अशा पाच जणांवर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैड परिवाराने फिर्याद दाखल केल्यावरच किती दागिने चोरी गेले हे स्पष्ट होणार आहे. भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने येथील व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरणात बनले आहे.