सुपा औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीने उद्योजक हैराण

सुपा औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीने उद्योजक हैराण

कारवाई करण्याची भाजपची मागणी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत ठेकेदारीवरून गुंडगिरी वाढत असून येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामे होत आहेत. या गुंडगिरीस वैतागून उद्योजक येथून काढता पाय घेत आहेत. गुंडांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना ही मागणी करण्यात आली. सुपा औद्योगिक वसाहतीमधील वाढती गुंडगिरी, ठेकेदारीतील वाद आणि समाज कंटकांचा प्रचंड त्रास होत आहे. अशा परिस्थितीमध्ये तालुक्यात येणारी गुंतवणूक स्थानिक गुंडागर्दीमुळे, हप्तेखोरीमुळे, जर बाहेर जात असेल तर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही बाब लांच्छनास्पद आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे तरुणांचे तयार झालेले ग्रुप, संघटना, प्रतिष्ठान अशा स्वरूपाची संघटित दादागिरी सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये वाढीस लागलेली आहे.

उद्योगधंद्यांच्या विकासावर पर्यायाने परिसराच्या विकासावर याचा गंभीर परिणाम होत आहे. ही परिस्थिती कायम अशीच राहिली तर छोट्या गुंतवणूकदारांपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसणार आहे. ज्या व्यक्ती संघटना प्रतिष्ठान ग्रुप सुपा औद्योगिक परिसरामध्ये उद्योजकांमध्ये दहशत पसरवत असतील, अशा सर्व संघटनांवर स्थानिक पोलीस प्रशासन, मा. जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांनी योग्य तो समन्वय करून तातडीने सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये विनाकारण फिरणार्‍या गुंडांचा बंदोबस्त करावा.

तोशिबा किंवा मिंडा सारख्या प्रतिष्ठित कंपनी आपला प्रकल्प स्थलांतरित करीत आहे. त्याविषयीच्या कारणांची योग्य ती चौकशी करून याची कारण मिमांसा जनतेसमोर आली पाहिजे. यासाठी प्रशासनाला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात येत आहे. या सर्व अपप्रवृत्तींवर कारवाई न झाल्यास समाजातील विविध घटकांशी चर्चा करून मोठे आंदोलन केली जाईल. असा देण्यात आला आहे. यावेळी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुका अध्यक्ष वंसत चेडे, सुजित झावरे, सुभाष दुधाडे, राहुल शिंदे, सुनिल थोरात, योगेश रोकडे, दत्तात्रय पवार, सागर मैड, मनोज मुंगशे, अमोल सोनार आदी उपस्थित होते .

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com