रायतळे, वाळवणे, सुपा बेकायदा मुरूम खडीची वाहतूक

रस्त्याची दुरवस्था; वाहतूक बंदीसह दुरूस्तीची मागणी
File Photo
File Photo

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

राज्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाळवणे येथील भैरवनाथ मंदीराकडे जाणार्‍या व रहद्दारीच्या रायतळे, वाळवणे, सुपा या रस्त्यावर दिवसाढवळ्या बेसुमार मुरूम, खडी, बांधकामासाठी लागणारी डस्टची अवैध्य अवजड वाहतूक केली जात असल्याने या रस्त्याचे तिन-तेरा वाजले आहेत. सुसाट वेगाने चालणार्‍या या हायवामुळे वाहनामुळे इतर वाहनांसह मोटारसायकल चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

सुपा ओद्योगिक वसाहतीसह तालुक्यात कारवाईचा बडगा उगारणार्‍या तहसिलदारांना दिवसाढवळ्या चालणारी ही बेसुमार अवैद्य वाहतूक दिसत नाही का ? असा सवाल नागरीकांसह प्रवाशांमधून केला जात आहे. दैनंदिन दळणवळणासाठी लागणार्‍या रस्त्यावर रात्रंदिवस ओव्हलोड अवजड वाहतून सुरू असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रूईछक्षत्रपती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने सुपा, वाळवणे येथील नागरीकांना या रस्त्यावरून ये- जा करावी लागते.

तर शेतकर्‍यांनी पिकवलेला माल मुख्य बाजार पेठ असलेल्या सुपा, पारनेर, नगर, पुणे याठिकाणी नेण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्यावरून दुध उत्पादक, शालेय विद्यार्थी, सुपा औद्योगिक वसाहतमधील कामगारांना रात्री अपरात्री या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने अनेकांना पाठ, कंबर दुखी यासह मणक्याचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर बांधकाम विभागाने अनेक दिवसांपासून दुर्लक्ष केल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.

कारवाईचा नुसता फार्स करणार्‍या तहसिलदारांनी दिवसाढवळ्या सुरू असणारी अवैद्य वाहतुकीवर कारवाई करून हे वाहने तातडीने बंद करावेत व बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन थेडले जाईल असा इशारा रूईछत्रपतीचे सरपंच मच्छिंद्रनाथ दिवटे, उपसरपंच मिनाताई दिवटे, वाळवणेचे सरपंच जयश्री पठारे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

गेली अनेक दिवसांपासून रायतळे, वाळवणे, सुपा रस्त्यावर मुरूम यासह बांधकामासाठी लागणार्‍या मालाची बेसुमार अवजड वाहतुक केली जात आहे. ही वाहने सुसाट वेगाने चालवली जातात. दिपावलीच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरु झाल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून पायी ये-जा करावी लागते. एखादा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तातडीने ही अवजड वाहतुक बंद करा.

- उत्तमराव पठारे, माजी सरपंच वाळवणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com