
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
नगर-पुणे महामार्ग, सुपा-पारनेर रोडवरील दुकानदारांनी काही प्रमाणात अतिक्रमणे स्वत:हून काढल्याने या रस्त्यांनी काहीसा मोकळा श्वास घेतला आहे. तसेच यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
नगर-पुणे महामार्ग, सुपा बस स्थानक चौक व सुपा पारनेर रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. सुपा बस स्थानक चौक ते सुपा विश्रामगृह या मार्गावर सायंकाळी रोज वाहतूक कोंडी होत असल्याने सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या पुढाकारातून तहसीलदार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली महामार्गावरील व्यावसायिकप्रतिनिधी, परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार अवळकंठे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत, नाहीतर महामार्गाच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यापासून 40 मीटरपर्यंत सरसकट अतिक्रमणे काढली जातील, तहसीलदार यांनी इशारा दिल्यानंतर, तसेच लवकरच प्रांताधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याचे ठरले होते. त्यावेळी सर्वच व्यावसायीकांनी स्वतः हून अतिक्रमणे काढण्याचे मान्य केले होते.
सोमवारी सकाळी पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी सहकार्यांसह सुपा बस स्थानक चौकातून या मोहिमेला सुरूवात केली. तेव्हा दुकानदारांनी पुढे आलेले शेड, फुलहारासाठी पुढे लावलेले बांबू, दुकानाचे बोर्ड स्वतःहून काढून घेतले. यावेळी अनेकांनी लोखंडी पाईप कापून अतिक्रमणे मागे घेतली. यामुळे नगर-पुणे महामार्गाने काही प्रमाणात मोकळा श्वास घेतला. हार, फुले विक्रेते व बेकारी विक्रेते यांनी स्वतःहून काही अतिक्रमणे काढल्याने रस्ताही मोकळा झाला.
सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन महामंडळ यांच्यात समन्वय नसल्याने सुपा बस स्थानक चौकही अतिक्रमणात गुरफटला आहे. मागील बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तर परिवहन अधिकारीही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नसल्याने तहसीलदार यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
नगर-पुणे महामार्ग व सुपा पारनेर रोडवरील दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत. प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडू नये. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठांच्या सुचनांचे पालन केले जाईल. अतिक्रमणे मागे घेणार्या दुकानदारांचे स्वागत आहे.
- नितिनकुमार गोकावे, पोलीस निरीक्षक सुपा.