पेट्रोल टाकून महिलेस जाळण्याचा प्रयत्न
सार्वमत

पेट्रोल टाकून महिलेस जाळण्याचा प्रयत्न

दहा वर्षांची मुलगी भाजली

Arvind Arkhade

सुपा |वार्ताहर|Supa

पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात पळवे खुर्द येथील दोघांनी वाघुंडे येथील महिलेला तिच्या घरी जाऊन धमकी देत ‘तू आमच्या वरील अत्याचाराची फिर्याद मागे घे’, असे म्हणत पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये राजाराम गणपत तरटे (वय 56) आणि अमोल राजाराम तरटे (वय 31) दोघे राहणार रा .पळवे खुर्द (ता .पारनेर) यांचा समावेश आहे.

याबाबत सुपा पोलीस स्टेशनला महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गुरुवारी (दि. 13) सकाळी साडेदहाच्या दरम्यान आम्ही आमच्या पळवे खुर्द येथील कोपीमध्ये जेवण करत असताना पळवे खुर्द येथील राजाराम तरटे व अमोल तरटे हे मोटार सायकलवर आले. त्यानंतर कोपीत येत आम्हाला दम देत म्हणाले ‘तू अत्याचाराची केस मागे घे’, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.

त्याचवेळी राजाराम तरटे याने हातातील पेट्रोल माझ्या दिशेने ओतले ते माझ्या दहा वर्षांच्या मुलीच्या अंगावर पडले व अमोल तरटे याने त्याच्या हातातील काडीपेटीमधील काडी पेटवून फेकली. ती मुलीच्या अंगावर पडून अंगावरील फ्रॉक पेटून मुलगी भाजली आहे, अशा प्रकारे आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणी पीडित फिर्यादीच्या तक्रारीवरून सुपा पोलिस स्टेशनचे ठाणे अमलदार एस. बी. चौधरी यांनी राजाराम तरटे व अमोल तरटे यांच्या विरुध भादवि कलम 307, 504 अनुसूचित जाती आणि जमाती, अत्याचार प्रतिंबधक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पीडितेच्या मदतीला प्रकाश आंबेडकर

या प्रकरणातील पीडित महिलेने वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा. डॉ. प्रकाश आंबेडकर यांना थेट फोन केला आणि झालेल्या अन्याय कथन केला. डॉ. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांना फोन करून सुप्याला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः सुप्यामध्ये दाखल झाले. तसेच पीडित महिलेची भेट घेत तिचे गार्‍हाणे ऐकून घेतले. त्यानंतर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर डॉ. आंबेडकर पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com