ना.गडाख होम क्वारंटाईन, सुनीताताई पॉझिटिव्ह
सार्वमत

ना.गडाख होम क्वारंटाईन, सुनीताताई पॉझिटिव्ह

सोनईत करोना संक्रमितांची संख्या 22 वर

Anant Patil

सोनई|वार्ताहर|Sonai

काल शनिवारी सकाळी आलेल्या करोना चाचणी अहवालात सोनईचे 3 जण संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एक जण सोनई जवळचे वंजारवाडी येथील असल्याचे समजले आहे.

दुपारपर्यंत सोनईत 22 संक्रमित, 82 निगेटिव्ह तर 30 अहवाल प्रतिक्षेत अशी परिस्थिती होती. दरम्यान मंत्री महोदयांच्या सौभाग्यवती पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोनईकरांची अस्वस्थता आणखी वाढली आहे. 4-5 दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती म्हणून त्यांची तपासणी केली.

शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार त्यांना करोनाची बाधा झाल्याचे निदान झाल्याने त्यांचेवर पुढील उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. या अहवालानंतर मंत्री शंकरराव गडाख स्वतःहून 14 दिवसांसाठी होम क्वॉरंटाईन झाले असून त्यांनी आपला स्त्राव तपासणीसाठी पाठविला आहे. त्यांनी स्वतः सकाळी ट्विटरद्वारे ही माहिती प्रसारीत केली.

शनिवारी सकाळी सोनईच्या 3 कोरोना बाधितांना रुग्णवाहिकेतून कोव्हीड सेंटरमध्ये नेण्यात आलेले असून त्यांचे संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. ग्रामपंचायतीने संपूर्ण सोनई गावात औषध फवारणी करण्याची गरज आहे परंतु ग्रामविकास अधिकारी ऐन करोना काळात रजेवर गेलेले असल्याने ग्रामपंचायत कडून औषध फवारणी व इतर प्रतिबंधक उपाययोजना होत नसल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुभाष राख यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान काल रात्री उशिरा ना. शंकरराव गडाख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अन्य दोघांनी रॅपीड टेस्ट मध्ये केलेल्या चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच दक्षिणेतील एका आमदारानेही स्वतःहून आपली करोना चाचणी करून घेतली. त्यांचाही अहवाल निगेटीव्ह आला आहे.

नामदार सौभाग्यवतींच्या अहवालानंतर सोनई नेवासा तालुक्यातून सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की ताईसाहेब आपण लढवय्या आहात. आपल्यामागे लाखो गोरगरीब कष्टकरी जनतेचे आशीर्वाद आहेत. आपण लवकरच कोरोनावर मात करून समाजकार्य चालू कराल, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com