
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
पाच वर्षे केंद्र व राज्यात स्वःपक्षाचे सरकार असतांना जिरवाजिरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आभासी जगात वावरत होते. त्यांना आभासी जगातून बाहेर काढण्याचे काम जनतेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत करून आशुतोष काळे यांच्या हातात विकासाची सूत्र सोपविली. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता अडीच वर्षातच ना. काळे यांनी अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावले. यामध्ये 5 नं. साठवण तलावाचा समावेश असून 131.24 कोटी निधीतून या तलावाचे काम सुरू झाले आहे. मात्र ज्यांच्याकडे विकास पहायची दृष्टी नाही ते बेताल आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. अशा विकास पाहण्याची दृष्टी नसलेल्यांनी डोळ्याच्या शिबिरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांना दिला.
सुनील गंगुले यांनी म्हणालेे, ना. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात 1000 कोटींच्यावर निधी मतदार संघासाठी आणून मतदार संघाचा कायापालट करून दाखविला. यामध्ये पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 5 नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधीतून सुरू झालेले काम फक्त विरोधकांनाच दिसत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचे डोळे तपासून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांच्या नावे 5 नं. साठवण तलाव होऊ नये यासाठी न्यायालयात खोटी याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने दत्ता काले यांना तंबी देऊन याचिका मागे घेण्यास सांगितले होते. तेच आ. काळे यांच्या नावे बोंबा मारत पाणी प्रश्न भिजत पडला असे म्हणतात.
अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराला गोदावरी कालव्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत होणारा पाणीपुरवठा शुद्धच होता व भविष्यात देखील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिक समाधानी आहेत. मात्र विरोधक धास्तावले आहेत.28 विकास कामांना विरोध करणारे, कोपरगावच्या पाण्याला विरोध करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे कोण हे जनतेने ओळखले आहे.
त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे वर्षानुवर्षापासून मिळणार्या पाण्याला दूषित पाणी म्हणून उगाचच संभ्रम निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडून सुरु आहे. मतदारसंघात झालेला विकास विरोधकांना दिसत नाही. त्यामुळे त्यांनी शिबिरात डोळे तपासून घ्यावेत व 5 नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाले का नाही ते स्वत:च्या डोळ्यांनी जाऊन पहावे,असा सल्ला सुनील गंगुले यांनी दत्ता काले यांना दिला आहे.