विकासकामांसाठी कटिबद्ध आमदार शंकररावांना साथ द्या - सुनील गडाख

मुरकुटेंना पळवून लावल्याची चर्चा || दोन गट समोरासमोर; काहीकाळ गोंधळ
विकासकामांसाठी कटिबद्ध आमदार शंकररावांना साथ द्या - सुनील गडाख

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव-इमामपूर येथील सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या प्रवरा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा बुधवारी सकाळी पार पडला.

जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी हे काम रखडले होते, परंतु माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची वारंवार भेट घेत व वेळोवेळी या कामाचा पाठपुरावा करत निधी मिळवल्याने हे काम पूर्ण झाले आहे.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचारसभेत आमदार गडाख म्हणाले होते की या पुलाचे काम निधीअभावी रखडणार नाही. सुरुवातीला करोनाच्या काळात अडचणी आल्या परंतु त्यानंतर शासन पातळीवर लक्ष देत गडाख यांनी निधी मंजूर करून आणल्याने व काम मार्गी लावल्याने हा पूल दळणवळणासाठी खुला झाला आहे.

यावेळी सुनीलराव गडाख म्हणाले, माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्तिगत पाठपुरावा करून पाचेगाव येथील मुळा आणि प्रवरा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे. शंकरराव गडाख हे तालुक्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असून त्यांना साथ देत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन सुनीलराव गडाख यांनी केले.

प्रास्ताविक शरद जाधव यांनी केले. याप्रसंगी दिगंबर नांदे , वामनराव तुवर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

पुलाचा प्रश्न मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातुन पूर्णत्वास नेल्याबद्दल सभापती सुनीलराव गडाख यांचा पाचेगाव व परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पाचेगाव, पुनतगाव, खुपटी, इमामूर, गोणेगाव, निंभारी, अंमळनेर, करजगाव, बेलपिंपळगाव, भालगाव, घोगरगाव व परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरकुटेंना पळवून लावल्याची चर्चा

पुलाचा लोकार्पण सोहळा परिसरातील ग्रामस्थांनी ठेवला होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य सुनीलराव गडाख यांना आमंत्रित केले, परंतु माजी आमदार मुरकुटे हे काही मोजक्या लोकांना घेऊन विरोध करण्यासाठी आले असता ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत त्यांना पळवून लावले. याची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.

दोन गट समोरासमोर; काहीकाळ गोंधळ

पुलाच्या दोन्ही बाजूने दोन गट समोरासमोर आल्याने काही वेळ गोंधळ उडाल्याचे पाचेगाव प्रवरा नदीवर पहावयास मिळाले.सत्ताधारी व विरोधक समोरासमोर येऊन घोषणा देत परिसर दणाणून टाकला. दोन्ही गटाच्या समर्थकांनी यावेळी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मुरकुटे यांनी पुलावरून काढता पाय घेत निषेध सभा घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मी स्वतः भाजपच्या काळात हा पूल मंजूर करून काम सुरू केले होते. तालुक्यात अनेक कामे आपण मंजूर केली अन् त्याचे श्रेय त्यांनी घ्यायचे काम केले. पुलाचे काम अजून अपूर्ण असताना त्यांनी आज उद्घाटनाचा घाट घातला. निवडणुकीच्या काळात त्यांनी माझ्यावर जे आरोप केले ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे. हे चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू असून आपल्याला प्रामाणिक काम करायचे आहे. पुढील काळात पाचेगावातील सर्व प्रलंबित रस्त्यांचे काम पूर्ण करणार आहोत, असेही ते म्हणाले. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गटांशी चर्चा करून शांतता कायम ठेवली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com