
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता 5 वी) परीक्षेच्या तयारीसाठी एमआयडीसीमधील सन फार्मास्युटीकल इंडस्ट्रिज कंपनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मदतीला धाऊन आली आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून शिक्षण विभागाला शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञानकुंभ प्रश्नपत्रिका संच देण्यात आले आहेत.
राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात येणार्या शिष्यवृत्ती परीक्षेत नगर जिल्ह्याचा निकाल आणि गुणवत्ता वाढावी, राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील अधिकाअधिक विद्यार्थी झळकावीत यासाठी कंपनीच्या सीएसआर फंडातून पूर्व उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी 120 रुपये याप्रमाणे 800 संच विकत घेऊन जिल्हा परिषदेला देण्यात आलेले आहेत. यासाठी कंपनीने 96 हजार रुपये खर्च केले आहेत. कंपनीने दिलेल्या या प्रश्नपत्रिका संचाचा फायदा जिल्ह्यातील 796 शाळांना होणार आहे.
नुकताच जिल्हा परिषदेत हा प्रश्नपत्रिका संच वाटप सोहळा पार पडला. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, कंपनीचे प्रोडक्शन हेड हरिष भराटे, एचआर हेड दादासाहेब पाटील, सीएसआर हेड सतीश भुसाळे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाटील यांनी केले तर विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांनी सूत्रसंचालन केले.
आभार लेखाधिकारी रमेश कासार यांनी मानले. कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, विलास साठे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र कापरे, अर्जुन गारूडकर, मीना शिवगुंडे, विस्तार अधिकारी मनीषा कुलट आणि अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांनी शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवून शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता वाढीसाठी उद्दिष्ट ठेवून काम करावेत, कंपनीच्यावतीने अधिकार्यांनी मार्गदर्शन केले.