पावसाने उन्हाळी कांदा लागवडीची अपेक्षा वाढली

File Photo
File Photo

वीरगाव |वार्ताहर| Virgav

जीवघेण्या प्रतिक्षेनंतर उत्तरा फाल्गुनीच्या उत्तरार्धात कोसळत असणार्‍या पावसाने खरीपासहित सार्‍याच उभ्या पिकांना जीवदान मिळालेच शिवाय पिकांची टवटवीही वाढली. आगामी उन्हाळी कांदा लागवडीकडे पाण्याअभावी शेतकर्‍यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र सध्या होत असलेल्या पावसाने आता कांद्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

उन्हाळी कांदा रोपांसाठी सध्या शेतकर्‍यांची तयारी चालू आहे. अनेकांनी रोपेही टाकली. परंतु मध्यंतरी पूर्णपणे उघडीप दिलेल्या पावसामुळे कांदारोपांच्या क्षेत्राची संख्या दरवर्षीच्या तुलनेत खुपच कमी आहे. पाऊसच नसल्याने आहे त्याच रोपांची लागवड होते की नाही ही शंका असतानाच हा पाऊस कोसळल्याने रोपांसाठी अधिक क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. यासाठी अर्थातच चालू नक्षत्रांसहित हस्त नक्षत्रातही पाऊस पडेल आणि परतीचा पाऊसही होईल या अपेक्षांवरच शेतक-यांचे कांद्याबाबदचे धाडस वाढणार आहे. पुढेही पाऊस होऊन भुजलस्तर वाढेल हा आशावाद अजून जीवंत आहे.

शेतकर्‍यांनी टाकलेल्या कांदारोपात अधिकची वाढ करण्याच्या मनसुब्यामुळे कांदा क्षेत्रात अंदाजापेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे.नोव्हेंबर, डिसेंबर अखेरीस लागवडी व्हायला हव्यात म्हणून जमिनीचा वाफसा मिळाल्यानंतर लगेचच कांदारोपांची लगबग सुरु होईल. अकोले तालुक्यातील आढळा परिसरात अनेक गावांच्या शिवारात शुक्रवारचा पाऊस 30 ते 40 मिलीमीटर पर्यंत कोसळला. काहीठिकाणी कदाचित तो जास्तही असेल. त्यामुळेच भविष्यातील पावसाचा भरवसा वाढल्याने पाण्याअभावी कानाडोळा केलेल्या कांदाक्षेत्रात वाढीचा अंदाज आहे.

खरीप हंगामाची कांदा लागवड तर फारच नगण्य आहे. पाण्याअभावी उन्हाळी कांदा लागवडीवरही मर्यादा येणार असल्याने कांद्याचे भाव समाधानकारक राहतील ही अपेक्षा आहे. दिवसेंदिवस कांद्याचे एकरी उत्पादनही घटत चालल्याने कमी उत्पादन, अपुरा पाऊस, गारपीट, उन्हाच्या झळा यामुळे उत्पादनाला मोठाच फटका बसतो. यामुळेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांना भविष्यात बर्‍यापैकी बाजारभाव मिळण्याची आशा आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाने खरीपाच्या उभ्या पिकांना चांगलीच उभारी दिली. बाजरीचा फुलोरा गळून कणसात दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. मूरघासासाठी आवश्यक असणार्‍या मकाचीही आता जोमाने वाढ होईल. झालेल्या पावसाने मका उत्पन्नाची खात्री आल्याने उभ्या मकाच्या बाजारात प्रतिगुंठा साधारण 500 रुपयांची घट झाली. करपून गेलेल्या सोयाबीन पिकालाही आता चांगल्या शेंगा लगडतील.चार्‍यालाही जीवदान मिळाल्याने पशुधनाचे होणारे हाल थांबतील. ऊसाबरोबरच भाजीपाला पिकाचीही या पावसामुळे चांगली भरणी झाली. सारीच पिके अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी अजून भरपूर पावसाची अपेक्षा आहेच. पिकांच्या जीवदानाबरोबर भूजलस्तरही अधिक वाढून सुखासुखी वर्ष कडेला जाईल, अशा अपेक्षा शेतकर्‍यांच्या वाढलेल्या आहेत.

खरीप कांदा 30 टक्के घटला

उशिराने सक्रीय झालेल्या मोसमी पावसामुळे पाण्याची टंचाई वाढली. उपलब्ध पाण्यात उभ्या पिकांबरोबर चारा जगविणे यासाठीच शेतक-यांची पराकाष्ठा सुरु होती. यामुळे खरीप कांदा लागवडीचे गणित बिघडले. जून-जुलै महिन्यात राज्यभरात साधारण 94 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप कांद्याची लागवड होते. तिच्यात 29 हजार हेक्टर क्षेत्राची घट होऊन 65 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होऊ शकली. पाण्याअभावी उन्हाळी कांद्याचेही क्षेत्रात घट होण्याच्या शक्यतेने कांद्याचे बाजारभावाची स्थिती समाधानकारक राहील हा अंदाज आहे.

सरकार विरुद्ध शेतकरी

कांदा लागवडीत घट होत असल्याने कांदा बाजार चढे राहतील. ग्राहकांना वाढलेल्या बाजारभावाचा फटका बसू नये म्हणून कांदा आयात, निर्यातीवर निर्बंध, निर्यात शुल्कात वाढ करुन सरकार दर आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार. खाद्यतेलाचीही आयात केल्याने देशातील तेलबिया उत्पादकांना आवश्यक बाजारभाव मिळेनात. आयातीमुळे तेलाचे बाजार कमी करुन ग्राहक हित जोपासले मात्र शेतकर्‍यांना याचा तोटा झाला. आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार ग्राहकहितालाच अधिक प्राधान्य देणार असल्याने कांदा प्रश्नावर सरकार विरोधी शेतकरी हा सामना रंगणारच आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com