कडाक्याच्या उन्हाळ्यात विजेचा खेळखंडोबा

शेतकरी, नागरिक हैराण; भारनियमनामुळे धाबे दणाणले
कडाक्याच्या उन्हाळ्यात विजेचा खेळखंडोबा

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

चोरुन वीज वापरणार्‍यांविरोधात महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी आकडे टाकून चोरून वीज घेतली जात असल्याचे आढळून आल्याने याविरुध्द धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. खरेतर हे महावितरण वीज कंपनीला उशीरा सुचलेलं शहाणपणचं म्हणावं लागेल. या आधीच ही कारवाई सुरू केली असती तर आज ही वेळ आली नसती. एकीकडे मोठ्या प्रमाणात वीज चोरी सुरू असताना दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी काय करत होते? हा देखील संशोधनाचा विषय आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीच्या वीजबिलाबाबत पठाणी वसुली सुरू केली होती. वीजबिल वसुली करतेवेळी शेतकर्‍यांनी प्रखर विरोध केल्यानंतर हा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला. रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकर्‍यांचे कनेक्शन तोडू नये, असे आदेश देण्यात आले. तरी देखील आदेश धाब्यावर बसवून वसुलीचा तडाखा सुरुच होता. जे चोरून वीज वापरत होते. त्यांची मात्र, यातून सुटका होत आहे. आधीच विजेचा तुटवडा, त्यात चोरून विजेचा वापर, यामुळे आणखी तुटवडा निर्माण झाला आणि लोडशेडिंगला सामोरे जावे लागले.

शेतीसाठी बारा तासांऐवजी आठ तासांचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये वीज कमी मिळत असल्याने आठवड्यातून एक दिवस रोटेशन पध्दतीने रोहित्र बंद ठेवण्यात येत आहे. त्यात भर म्हणजे एक आठवडा रात्रीचा व एक आठवडा दिवसाचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने वाफ्यात पाणी जात नाही तेच मागे वीज जाते. त्यामुळे विहिरीत पाणी असून देखील कडक उन्हात पिके पाण्यावाचून करपू लागली आहेत.

विजेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने शेतीबरोबरच आता सिंगल फेजवर देखील भारनियमन सुरू झाले आहे. सकाळी चार तास व रात्री चार तास असे चोवीस तासांतून आठ तास वीज गायब असल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. उन्हाची तिव्रता प्रचंड वाढली आहे. सूर्य आग ओकत आहे. दिवसाचे तपमान सरासरी 44 अंशांवर जाऊन पोहोचले आहे. उन्हामुळे जिवाची काहीली होत आहे. प्रचंड उकाड्यापासून सुटका होण्यासाठी नागरिकांनी पंखे, एसी, कुलर यांचा आसरा घेतला असला तरी अत्यंत कमीदाबाने वीजपुरवठा होत असल्याने ही उपकरणे धडाधड जळत आहेत व पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी वाईट अवस्था झाली आहे.

सकाळच्या भारनियमनाचा वेळ कसाबसा निघून जातो. परंतु रात्रीचे चारतास मात्र, जीवघेणे ठरत आहेत. एकतर उष्णतेमुळे निर्माण झालेला प्रचंड उकाडा व दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेले डासांचे साम्राज्य. रात्री साडेअकरानंतर वीज येत असल्याने तोपर्यंत रात्र जागून काढावी लागत आहे.ही परिस्थिती संपूर्ण तालुकाभर आलटून पालटून आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक दोन्ही अक्षरशः महावितरणला वैतागले आहेत.

राज्याच्या उर्जामंत्र्यांनी गुजरात सरकारकडून वीज विकत घेण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगून दोन-तीन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे सांगितले होते. परंतु सुरळीत होण्याऐवजी आठ तासांचे भारनियमन अंगावर पडले. त्यामुळे बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात, असे धोरण सरकारचे दिसत आहे. वास्तविक पाहता गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या जोरात सक्तीची वीजबिल वसुली सुरू होती. त्यावेळीच उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या विजेच्या तुटवड्याबाबत सरकारने काळजी घ्यायला हवी होती.आज कोळशाचे कारण पुढे केले जात आहे. आज ऐन उन्हाळ्यात सर्वत्र विजेचा खेळखंडोबा सुरू असताना व आठ-आठ तासांचे भारनियमन सुरू असताना राज्यकर्त्यांना याचे काहीच देणेघेणे दिसत नाही हे विशेष!

एकीकडे उन्हाचे चटके अन् दुसरीकडे विजेचे झटके, यात सर्वसामान्य शेतकरी व नागरिक पुरता होरपळून निघाला आहे. ही परिस्थिती अशीच राहणार की आणखी चिघळणार? याबाबत कोणी छातीठोकपणे सांगण्यास तयार नाही.

Related Stories

No stories found.