सुकेवाडीतील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा

सुकेवाडीतील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील सुकेवाडी येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील विजय रावसाहेब कुटे (वय 37) याचा मृतदेह शुक्रवारी तालुक्यातील मालदाड येथील डोंगराजवळ आढळला होता. मयत विजय कुटे याच्या विरोधात गावातीलच एका महाविद्यालयीन युवतीने पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती.

पोलिसांनी विजयच्या विरुद्ध विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अटकेच्या व बदनामीच्या भीतीने तो पसार झाला होता. त्याचा मृतदेह मालदाड येथील डोंगरामध्ये आढळल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी विजय याचा खून झाल्याचा आरोप करत त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.या नातेवाईकांनी विजय याच्या शवविच्छेदनासही विरोध केला होता. यानंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. विजय याने विषारी पदार्थ सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

याबाबत मयताची पत्नी साधना विजय कुटे हिने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पोपट सखाराम धुमाळ, पोपट सखाराम धुमाळ यांची पत्नी नाव माहीत नाही, सोनिया वाल्मिक नेहे, गणेश उर्फ सुरज भाऊसाहेब सातपुते, नाना गणपत कुटे, अजय सुनील सातपुते, वैष्णवी रवींद्र धुमाळ (सर्व राहणार सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 653/2023 भारतीय दंड संहिता 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com