कर्जत l Karjat (तालुका प्रतिनिधी)

पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत त्यांना संपवून कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रथितयश डॉ. महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केली आहे.

आपल्या कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून संमतीने हा निर्णय घेतल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणार्या एखाद्या संस्थेला दान द्यावी, अशी इच्छाही डॉ. थोरात यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राशिनमध्ये नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेवली.

डॉ. थोरात यांचे राशीनमध्ये श्रीराम नावाचे हॉस्पिटल आहे. शनिवारी सकाळी दहा वाजले तरी देखील हॉस्पिटल उघडले नाही, यामुळे शेजारील नागरिकांनी डॉ. थोरात यांच्या मित्रांना याबाबत माहिती दिली.

यानंतर मित्रपरिवार आले आणि दार ठोठावले. परंतु दार उघडत नाही हे पाहून त्यांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी डॉ. महेंद्र व वर्षा थोरात, मोठा मुलगा कृष्णा (वय 16) व लहान मुलगा कैवल्य (वय 7) हे मृतावस्थेत आढळून आले. आधी तिघांना विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी गळफास लावून घेतल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

थोरात यांच्या घरात पोलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. त्यावरून मोठा मुलगा कृष्णा याच्या कर्णबधीर व्यंगाला कंटाळून हा प्रकार घडल्याचे दिसून येते. चिठ्ठीत म्हटले आहे, आम्ही आज आपल्यापासून कायमच निरोप घेत आहोत. कृष्णाला कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे त्याचे समाजामध्ये अपराधीपणाने राहणे आता सहन होत नाही.

अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालो आहोत. कृष्णाचे कशातच मन लागत नाही. मात्र, तो कधी बोलून दाखवत नाही. मात्र, त्याचे हे दु:ख आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी संमतीने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबादर धरण्यात येऊ नये. असे कृत्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही, मात्र इलाज नाही, आम्हाला माफ करा, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.

कृष्णा हा क्रिकेट खेळाडू होता. त्याला पुण्यातील एका क्रीडा संस्थेत शिक्षणासाठी पाठविले होते. त्याला ऐकू यावे, यासाठी बरेच उपचार केले. मात्र, त्यात यश येत नव्हते. त्याला श्रवणयंत्रही घेऊन देण्यात आले होते. त्याचाही उपयोग होत नव्हता.

अनेकांशी स्नेहबंध

डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत. राशीनमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. ते चांगले चालत होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे स्नेहबंध वाढले होते. मात्र, आज अचानक त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

चिठ्ठीवरून पुढील तपास

यावेळी माध्यमांशी बोलतांना अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. सकाळी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फोन आल्यानंतर पोलीस अधिकारी व मी समक्ष घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची कर्जत पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. याच प्रमाणे मृत्युपूर्वी डॉक्टर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून त्याअनुषंगाने पुढील तपास पोलिस करीत आहेत.