उसाचे तुकडे वाहतूक करणार्‍या वाहनांना कोण शिस्त लावणार?

परिवहन विभागाची डोळेझाक, अपघातापूर्वीच उपाययोजना करण्याची मागणी
उसाचे तुकडे वाहतूक करणार्‍या वाहनांना कोण शिस्त लावणार?

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने बाभळेश्वर ते नेवासाफाटा या राज्यमार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. खडबडीत झालेला राज्यमार्ग आणि यंत्राद्वारे तोडणी केलेल्या उसाचे तुकडे घेऊन जाणार्‍या वाहनातून राज्यमार्गावर उसाचे तुकडे पडून होणारे अपघात रोखण्यासाठी या वाहनांना शिस्त लावण्याची जबाबदारी असलेल्या परिवहन विभागाने कारवाई करण्यास डोळेझाक केल्याने या वाहनांना शिस्त लावणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपघात घडण्यापुर्वीच परिवहन विभागाने या वाहनांना शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.

सध्या ऊस गळीत हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी झाल्याने गळीत हंगामाने चांगलाच वेग घेतल्याचे दिसत आहे. बाभळेश्वर ते नेवासाफाटा या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जात असल्याने या राज्यमार्गावर ऊस गळीत हंगाम सुरू असताना मुंग्यासारखी वाहनांची वर्दळ असते. अगस्ती, संगमनेर, युटेक, कोळपेवाडी, संजिवनी, प्रवरानगर, गणेशनगर, अशोक या सर्वच साखर कारखान्यांची तर भेंडा, सोनई व गंगामाई या कारखान्यांचीही वाहने काही प्रमाणात या राज्यमार्गावरून उसाची वाहतूक करतात. दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांची टंचाई भासू लागल्याने सर्वच कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्रांना पसंती दिली आहे.

ऊसतोडणी यंत्राद्वारे तोडणी केलेल्या उसाचे बारीक तुकडे केले जातात. हे तुकडे ट्रक किंवा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून कारखान्यापर्यंत नेले जातात. उसाच्या तुकड्यांनी वाहने भरगच्च भरून सुरक्षेची काळजी न घेता राज्यमार्गावरून जात असतात. हा राज्यमार्ग अत्यंत खडबडीत झाल्याने या भरधाव वाहनातून उसाचे तुकडे खाली पडतात. दुचाकी व चारचाकी वाहनांची या राज्यमार्गावर मोठी वर्दळ असल्याने दुचाकीस्वारांच्या अंगावर उसाचे तुकडे पडून अपघात झाले आहेत. तर चारचाकी वाहनांवर तुकडे पडून काचा फुटणे व वाहनांचे पत्रे चेमटणे अशा दुर्घटना प्रत्येक वर्षी झाल्या आहेत. त्यापैकी अनेकांना दुखापती होऊन कायमचे अपंगत्वही आले आहे तर चारचाकी वाहन चालकांनाही मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

राज्य मार्गावरील वाहनांना शिस्त लावण्याची जबाबदारी परिवहन विभागाची असतानाही परिवहन विभाग या प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. एरव्ही दुचाकीवरून ट्रीपल सिट जाणार्‍या दुचाकीस्वारांना घसघशीत दंड करणारा परिवहन विभाग राज्यमार्गावरून जाताना कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता निरपराध प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत ठरणार्‍या या वाहनांवर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असून अपघात होण्यापुर्वीच परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com