ऊस पाचटाचे होणार शंभर टक्के व्यवस्थापन

पाथर्डी तालुका कृषी विभागाची मोहीम
ऊस पाचटाचे होणार शंभर टक्के व्यवस्थापन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

साखर कारखान्याला गाळपासठी ऊस तोडणी झाल्यानंतर ऊस पाचटाचे शंभर टक्के व्यवस्थापन करून एकरी चार ते पाच टन सेंद्रिय खत मिळते. या विशेष मोहिमेला तालुका कृषी विभागाने प्राधान्य देत हा उपक्रम राबवण्यासाठी शेतकर्‍यांत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली आहे.

यावर्षी पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर येथील शेतकरी ऊस पाचटाचे शंभर टक्के व्यवस्थापन करणार आहेत. यासाठी कृषी विभागाने या उपक्रमाला चांगले प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली. तालुक्यातील औरंगपूर येथील सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचरट जाळून टाकतात ते जाळण्याऐवजी त्या पाचरटाचे शंभर टक्के व्यवस्थापन करणार असून उसाच्या पाचरटातून एकरी चार ते पाच टन सेंद्रिय खत मिळणार आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये उसाच्या खोडवा पिकासाठी नैसर्गिक आच्छादन होणार असून पाण्याची बचत होऊन ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.

याबाबत औरंगपूरचे सरपंच दिलीप किलबिले, उपसरपंच ईश्वर देशमुख यांच्या शेतात कृषी विभागाच्या माध्यमातून ऊस पिकाचे पाचरट व्यवस्थापनाबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उसाच्या पाचटाचे व्यवस्थापन कसे करावे,त्याचबरोबर ऊस पाचरट मशीन द्वारे पाचरटाची कुट्टी करून त्यानंतर एकरी एक बॅग युरिया, एक बॅग एस एस पी व चार किलो पाचरट कुजवणारे जिवाणू याचा वापर केल्यास पाचरटाच्या कुट्टी लवकर विघटन होऊन त्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होते.तसेच उन्हाळ्यामध्ये नैसर्गिक आच्छादनाच्या माध्यमातून पाण्याची बचत व तणांचे ही नैसर्गिक नियंत्रण करता येते.अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिली.

यावेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब किलबिले, दिगंबर देशमुख, जयदेव देशमुख, जयदेव किलबिले, दीपक काकडे, अमोल देशमुख, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी मोहन सिंग राजपूत, जगदीश शिरसाठ आदी उपस्थित होते.

सेंद्रिय शेतीला महत्त्व प्राप्त झाल्याने सेंद्रिय खत निर्मितीचे नवनवे अवलंब शेतकर्‍यांनी अवलंबले पाहिजे त्यासाठीचा चांगला उपक्रम कृषी विभागाने तालुक्यात हाती घेतला आहे या माध्यमातून शेतकर्‍यांना स्वतःचे सेंद्रिय खत घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये होऊ शकते. तसेच प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. पाचटाचे व्यवस्थापनाची महत्त्व औरंगपूर येथील गावकर्‍यांना समजले असून यापुढे कोणीही पाचट जाळणार नाही,असा संकल्पही गावकर्‍यांनी केला आहे.

- सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com