उक्कलगावात ऊसतोडीवरून प्रचंड राजकारण

चालू क्षेत्रातील हार्वेस्टर मशीन काढून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला
उक्कलगावात ऊसतोडीवरून प्रचंड राजकारण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगर जिल्ह्यात ऊस तोडीचा प्रश्न प्रचंड भेडसावत असतानाच कसेबसे ऊसतोडीसाठी आलेले मशीन राजकीय दबाव टाकून काढून घेण्याचा प्रयत्न समाजसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काल तुक्यातील उक्कलगाव येथे हाणून पाडला.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उक्कलगाव येथे अद्यापही अनेक शेतकर्‍यांचा ऊस उभा असून शेतकरी तोडणीसाठी मेटाकुटीला आले आहेत.अनेकवेळा मिनतवार्‍या करून केन हार्वेस्टर मशिन कसेबसे ऊसतोडणीसाठी अपर्णा गुलाब गाडेकर यांच्या क्षेत्रात आले असता स्थानीक गावपुढार्‍यांनी जाणीवपूर्वक हे मशीन चालू क्षेत्रातून काढून घेण्याचा प्रयत्न केला.मात्र हे वृत्त वार्‍यासारखे पसरताच समाजसेवा मंडळ व शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते अपर्णा गाडेकर यांच्या क्षेत्रावर जमा झाले. कोणत्याही परिस्थितीत सदर क्षेत्रातील ऊसतोडणी झाल्याशिवाय हार्वेस्टर मशिन जागेवरून हलू दिले जाणार नही असा पवित्रा आक्रमक शेतकरी कार्यकर्त्यांनी घेतल्याने काहीकाळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.अखेर कारखाना प्रशासनाने नमते घेत सदर ऊसतोडणीस परवानगी दिल्याने तूर्त वादावर पडदा पडला.

मात्र सदर प्रकाराला दोन दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटी निवडणुकीतील पराभवाची किनार असल्याची खुमासदार चर्चा परिसरात असून गुलाब गणपत गाडेकर हे ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पा.थोरात यांचे भाचे आहेत.सोसायटी निवडणुकीतील गुलाब गाडेकर यांची भूमिका जिव्हारी लागल्याच्या भूमिकेतून हा प्रकार घडला असला तरी अशोक कारखाना ही शेतकर्‍यांची कामधेनू असून त्याचा मालकीहक्क सभासदांचा आहे.शेतकर्‍यांवरील अन्याय कदापीही खपवून घेतला जाणार नाही.एकवेळ माझा दहा एकर ऊस तोडणीअभावी तसाच राहिला तरी चालेल पण परिसरातील शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी रोखठोक भूमिका इंद्रनाथ थोरात यांनी यावेळी घेतली.

दरम्यान या संकुचित मनोवृत्तीचा उक्कलगाव पंचक्रोशीतून निषेध व्यक्त होत असून शेतकरी प्रचंड रोष व्यक्त करत असल्याचे चित्र काल बघायला मिळाले.शेतकरी व कार्यकर्ते यावेळी प्रचंड आक्रमक झाल्याने एकजुटीपुढे कारखाना प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com