ऊस तोडणीला दोन महिने उलटूनही पेमेंट नाही

साखर कारखानदारांना पडलाय विसर
File Photo
File Photo

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

शेतकर्‍यांचे ऊस (Sugar) तुटून दोन महिने होत आले आहेत. तरी देखील अद्यापपर्यंत काही साखर कारखान्यांनी उसाचे (Sugar factory) पंधरवाडा पेमेंट (Payment) केलेले नाही. जणू साखर कारखान्यांना (Sugar factory) पंधरवाडा पेमेंटचा (Payment) विसर पडलाय की काय? अशी शंका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना येऊ लागली आहे. तरी संबंधित साखर कारखान्यांनी (Sugar factory) तूटून गेलेल्या उसाचे तातडीने पंधरवाडा पेमेंट (Payment) करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

यंदा उसाचे पीक (Sugar Crops) जास्त असल्याने साखर कारखान्यांची (Sugar Factory) चांदी झाली आहे. शेतकर्‍यांचे लक्ष ऊस तोडीकडे लागल्याने याचा फायदा घेत साखर कारखान्यांनी पंधरवाडा पेमेंट लांबवले आहे. डिसेंबर महिन्यात तुटलेल्या व जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात तुटलेल्या उसाचे अद्याप पेमेंट (Payment) न झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वास्तविक पाहाता ऊस तुटून गेल्यानंतर पंधरा दिवसात त्यांचे पेमेंट करणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. परंतु यंदा साखर कारखान्यांनी शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसविले आहेत.

साखर चाळीस रुपयावर जाऊन पोहोचली असताना उसाला एफआरपीचे कारण पुढे करुन 2100 ते 2200 रु. प्रतिटन भाव देण्यात येत आहे. ज्यावेळी साखर 35 रुपये किलो होती, तेव्हा कसा काय 2400 ते 2500 रुपये प्रतिटन भाव ऊस उत्पादकांना मिळाला? त्यावेळी एफआर पी नव्हती का? आज मात्र साखरेचे भाव जास्त असून देखील उसाला भाव कमी मिळत आहे. इथेनॉल साठ रुपये दराने सरकार खरेदी करणार असल्याच्या घोषणा झाल्या. परंतु प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या हातात काहीच पडले नाही. इथेनॉलमुळे मात्र साखर उतार्‍यात घट झाली.त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. महागाईच्या काळात शेतमालाला भाव नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच ऊस तुटून दोन महिने झाले तरी अद्याप पेमेंट झालेले नसल्याने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित कारखान्यांनी लवकरात लवकर पंधरवाडा पेमेंट करण्याची मागणी केली आहे.

राजकीय कुरघोडीत व्यस्त असणार्‍या राज्यकर्त्यांना शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किंमती आभाळाला भिडल्या. वीजबिलाअभावी शेतीचे वीज कन्येक्शन कट झाले. ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा, कांदा आदी पिके संकटात सापडली आहेत. किटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केल्याने फवारणी व मशागतीचे दर तिप्पट झाले आहेत. नगदी पीक म्हणून ऊस केला तर यंदा उसाची अशी परवड झाली. दोन महिने झाले तरी पेमेंट नाही. अशा परिस्थितीत कर्ज कसे फिटणार? मुलामुलींचे शिक्षण कसे होणार? त्यांचे लग्न कसे होणार? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्यासमोर असताना साखर कारखान्यांनी पेमेंट लेट करुन जणूकाही थट्टाच मांडली असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com