
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यात ऊसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढले आहे. यामुळे तालुक्यातील कारखान्यांला कार्यक्षेत्रातील ऊस तोडताना नाकीनऊ आले आहे. दुसरीकडे हेलपाटे मारूनही शेतकर्यांना तोडणी मिळत नाही. अशातच उसाला तुरे येऊन ऊस पोकळ होऊन वजन घटत चालले आहे. तोडणी मजुरांची टंचाईमुळे टोळ्या तसेच दुसरीकडे अशा असलेले हार्वेस्टरही मिळेनाा. यामुळे पेटवून दिला तर किमान कोणताही कारखाना तातडीने ऊस नेईल या भाबड्या आशेने शेतकर्यांना शेतातील उभा ऊस पेटवून देण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात उसाचे 21 हजार 436.10 हेक्टर क्षेत्र आहे. यात आडसाली, पूर्व हंगामी, सुरू, खोडवा असा मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. तालुक्यातील नागवडे आणि जगताप सहकारी साखर काराखण्याचे गाळप विक्रमी आहे. देवदैठणचा साजन शुगर जोरात सुरू आहे. पाचपुते यांचा बंद असलेल्या हिरडगावच्या कारखान्याचे गाळप सुरू केले. मात्र त्यांच्याकडे टोळ्या नसल्याने त्यांनी बाहेरून ऊस आणण्यावर भर दिला. यामुळे त्याचा तालुक्यातील शेतकर्यांना काहीच लाभ मिळत नाही. तालुक्यात नागवडे ,जगताप कारखान्याच्या टोळ्या आहेत. तसेच इतर कारखाण्याच्या टोळ्या व बोटावर मोजता येतील एवढे हार्वेस्टरही आहेत.
ऊसाची खोडवा आणि लागवड होऊन बारा पंधरा महिने झाले . त्याला पाणी खत घालून हिरवे ठेवले पण यंदा लवकरच उसाने तुरे टाकले यात शेतकरी ऊसाच्या तोडीसाठी कारखान्याच्या दारात हेलपाटे मारत आहेत. मात्र ऊन वाढले अन उसाला तुरे अल्याने उसाला वाढ राहिली नाही. उलट ऊस पोकळ होऊन वजन घटू लागले आहे. नाईलाजाने शेतकर्यांनी कारखान्यांच्या टोळी मुकादमाची मनधरणी सुरू केली. यात टोळी वालेही वाढे नसल्याने तोड करायला नकार देत आहेत. अनेक ठिकाणी पैशांची मागणी होते.
शेतातील उभा ऊस जाण्यासाठी टोळीवाल्यांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी सरसावले. आता एवढे करूनही ऊसाचे चिपाडे होताना शेतकर्यांना पाहवत नसल्याने हवालदिल झालेले अनेक शेतकरी ऊस पेटवून देण्याचा विचार करत आहेत. कारखानाही तोड देईल यामुळे आपला या हंगामात ऊस गाळपला जाईल आणि किमान खर्च तरी वसूल होईल यासाठी शेतकरी हे करायला मागे पुढे पाहत नाहीत.
शेतकर्याच्या ऊसाला आग लागल्यास नुकसान कमी करण्यासाठी कारखाने कार्यक्षेत्रातील असा ऊस तोडणीस प्राधान्य दिले जाते. यामुळे वजनात घट बसते. तसेच चांगल्या ऊसाच्या तुलनेत बाजारभाव कमी मिळतो. असे नुकसान होत असले तरी केवळ ऊस तुटावा यासाठी शेतकरी हे पाऊल उचलत असल्याचे वास्तव आहे.