ऊस तोडणी मजुरांना शौचालय उपलब्ध व्हावीत

साखर कारखाना व्यवस्थापनासह प्रशासनाने लक्ष घालण्याची ग्रामीण भागातून मागणी
ऊस तोडणी मजुरांना शौचालय उपलब्ध व्हावीत

शहरटाकळी |वार्ताहर| Shahar Takali

राज्य आणि केंद्र सरकारमुळे राज्य हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करत आहे. उघड्यावर शौचास बसणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. शेवगाव तालुक्यानेही कौतुकास्पद कामगिरी केली असून तालुक्यातील अनेक गावांनी हागणदारी मुक्तीकडे यशस्वी वाटचाल केली आहे. मात्र, या यशस्वी कामगिरीला ऊसतोड कामगारांमुळे बट्टा लागण्याची चिन्हे आहेत. उघड्यावर जाणार्‍या ऊस तोडणी मजुरांना शौचालय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. या गंभीर प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनास साखर कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची वेळ आली आहे.

ऊसतोड हंगाम सुरु झाल्याने ऊसतोड मजूर कामावर हजर झाले. प्रत्येक गावात दोन ते पाच महिन्यांच्या कलावधीसाठी दैनंदिन गरजा भागतील अशा ठिकाणी मजुरांनी आपल्या छोटेखानी वस्त्याच तयार केली आहेत.दरवर्षीप्रमाणे ऊस तोडणी हंगाम सुरु झाल्यापासून संपेपर्यंत विपरीत परिस्थितीशी सामना करत हे ऊस तोडणी कामगार राबत असतात. यात उघड्यावर शौचास जाणे ही एक लाजीरवाना प्रकार असल्याचे तोडणी कामगारांचे म्हणणे आहे. उघड्यावर शौचास जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे संबंधित साखर कारखान्यांनी शौचालय निर्माण करावे किंवा फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी.

हे शक्य नसेल तर गावागावातील सार्वजनिक शौचालय ऊसतोड मजुरांना खुले करून द्यावेत, तसा आदेश पारित करावा किंवा ग्रामसेवकांना मार्गदर्शक सूचना करण्याची गरज आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान आणि राज्य सरकारच्या हागनदारी मुक्त महाराष्ट्र संकल्पानेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेवगाव तालुक्यातील अनेकांनी शासकीय अनुदान घेऊन आपल्या घरी शौचालायाचे बांधकाम केले आहे. हागणदारीमुक्त गाव संकल्पनेत केवळ शौचालय बांधणे उद्दिष्ट नसून उघड्यावर शौचास जाण्याची सवय संपुष्टात आणणे हा मूलाधार आहे.

गावातील प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून गाव हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेला पाठबळ द्यावे, असा प्रयत्न केला जात आहे. यामुळे अनेक गावात उघड्यावर शौचास जणार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. याचा परिपाक म्हणजे गाव हागनदारी मुक्तिकडे वाटचाल करू लागलेत. आता ऊसतोड मजुरांची अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार आणि संबांधित साखर कारखान्यांनी हा प्रश्न तातडीने सोडणे आवश्यक झाले आहे.

उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने राहण्यासाठी जागा लवकर उपलब्ध होत नाही. झालीच तर शेजार्‍यांचे बोलणे ऐकून घ्याव्या लागतात. यातून कधीकधी भांडणाचे प्रसंग उभे राहतात. यामुळे जिल्हा भर ऊस तोडणीचे काम करणार्‍या मजूरांची सोय करत त्यांना शौचायलयाची सोय करून द्यावी.

- एक ऊसतोड मजूर.

शासन निर्णयाची अंबलबजावणी करत शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखाने आणि शासन यांनी संयुक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य संपन्न परिसर बनून स्वच्छ सुंदर आणि हागणदारी मुक्त राज्याचे आणि जिल्ह्याचे स्वप्न साकार होईल.

- स्थानिक नागरिक, शेवगाव तालुका.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com