आमच्या पोरांनी साळाचं त्वांड बी पाहिलं नाय; उसाच्या फडातच मोठं हुत्यात

वळणला ऊस तोडणी मजुरांनी मांडल्या संसाराच्या वेदना
आमच्या पोरांनी साळाचं त्वांड बी पाहिलं नाय; उसाच्या फडातच मोठं हुत्यात

वळण |वार्ताहर| Valan

पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंतीचे काम नशिबी आल्याने आपुला संसारप्रपंच पाठीशी बांधून जळगाव जिल्ह्यातून अनेक ऊस तोडणी मजूर राहुरीच्या उसाच्या फडात डेरेदाखल झाले आहेत. ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने गेली आठ महिने गावाकडे मिळेल ते काम करणारे हे ऊस तोडणी मजूर गेल्या अनेक वर्षापासून ऊस तोडणीसाठी तालुक्याच्या वार्‍या करीत आहेत. सुमारे चार महिने बाहेर राहून ऊस तोडणी करून जमा झालेला पैसा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ठेवीत आहेत.

राहुरी तालुक्यातील वळण येथे ऊस तोडणी कामासाठी जळगाव येथून ऊस तोडणी कामगार आले आहेत. सागर सोनवणे व त्यांची पत्नी पूजा सागर सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून ऊस तोडणीचे काम करीत आहेत. त्यांना सध्या दोन महिन्याचे छोटेसे बाळ आहे. त्या बाळाला घेऊन ऊस तोडणीचे काम करीत आहेत. धामणगाव येथून ऊस तोडणीसाठी वळण येथे आले आहेत. ते म्हणाले, आमचे वडील ,आजोबा ऊस तोडणीचे काम करीत होते. तेव्हापासून आम्ही देखील त्यांच्याबरोबर ऊस तोडायला येत होतो. त्यामुळे आमचे शिक्षण झालेच नाही. तर शाळेचे त्वांड देखील पाहिले नाही. लहानपणापासूनच कोयता हाती आला. अन् उसाच्या फडातच आमचं आयुष्य गेलं. आमची पोरं बी आता हेच काम करणार हाय.

प्रपंचासाठी ऊस तोडणी शिवाय पर्याय नाही. दररोज शे-दोनशे वाढे निघतात. त्यावरच उदरनिर्वाह करावा लागतो. सध्या वाढ्याच्या पैशावरच प्रपंच भागवावा लागतो. आम्हाला ऊस तोडणी करत असताना ऊन, तहान, वारा, पाऊस याला सामावून घ्याव लागतं. आमच्या गावाकडे कायम दुष्काळ असतो. त्यामुळे भटकंती करीत गाळपात कामधंदा करावा लागतो. आमची पोरांना बी शाळा काय हे माहिती नाही. अशी खंत सोनवणे यांनी व्यक्त केली. मायबाप सरकारनं आमच्या लेकरांच्या आयुष्याच्या भल्यासाठी काय तरी निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com