
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
पाचेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे यंदा ऊस पिकाचे उत्पादन कमी येऊन शेतकर्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे.
अतिवृष्टीत ऊस पिकाच्या क्षेत्रात सातत्याने पाणी राहून उसाचे मुळं सडून गेली. त्यात उसाची वाढ खुंटल्याने उत्पादनात कमलाची घट आली असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
अशोक कारखान्याच्या अंतर्गत चाळीस गावे येणार्या ऊस क्षेत्रात ज्या शेतकर्यांनी मागील वर्षांपूर्वी प्रति एकर 80 ते 90 टनापर्यंत उसाचे उत्पादन घेतले, त्या शेतकर्यांना यंदा अतिवृष्टीमुळे एकरी 30 ते 40 टना पर्यंत उत्पादनावर समाधान मानावे लागले. निम्याहून अधिक घट होऊन शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसत आहे. कार्यक्षेत्रात मागील वर्षी 10 हजार 175 हेक्टर क्षेत्र ऊस गाळपासाठी होता.
त्यात 8 लाख 52हजार मेट्रिक टन ऊस अशोक कारखान्यात गाळप करण्यात आला तर 2 लाख 18 हजार मेट्रिक टन बाहेरील कारखान्यात अशोक कारखान्यामार्फत इतर ठिकाणी गाळपास पाठविण्यात आला होता. मागील वर्षी एकूण 10लाख 71 हजार 505 मेट्रिक टन गाळप झाले.त्यात सरसरीत 90.76 म्हणजे जवळपास 91 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळाल्याची माहिती समोर आली.
यावर्षी देखील जवळपास ऊस क्षेत्र तेवढ्याच म्हणजे 9 हजार 746 हेक्टर आहे. आजची प्रति हेक्टरी उसाचे सरासरी उत्पादन पाहिल्यास ते 65 टनापर्यंत घसरल्यचे दिसून येत आहे.म्हणजे ऊस उत्पादनात 35 ते 40 टक्क्याने घट येऊन शेतकर्यांना व ऊस कारखानदारांना देखील आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आज अखेर 4 लाख 50 हजार साखर तयार झाली आहे. सरासरी उतारा 11.31 आहे. दिडशेहून अधिक ऊस टोळ्या कार्यक्षेत्रात उपलब्ध असून दोन ऊस तोडणी यंत्रे देखील सुरू आहेत.
मागील हंगामात अशोक कारखाना 11 जून 2022 अखेर सुरू होता. त्यावेळी उसाचे उत्पादन शेतकर्यांना चांगले मिळाले. पण यावर्षी ऊस क्षेत्र तेवढेच असताना देखील कारखाना मार्चअखेर बंद होईल असे चित्र निर्माण झाले आहे. कारण शेतकर्यांच्या ऊस उत्पादनात मोठी घट येऊन शेतकर्यांबरोबर कारखाना देखील अडचणीत सापडला आहे. ऊस तोडणी कामगारदेखील हैराण झाले आहे. कारखान्यामार्फत ऊस तोडणी कामगारांना उचली दिल्या, त्या देखील फिटतात की नाही हा देखील प्रश्न आहे.
मागील वर्षी जिल्ह्यासह अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे ऊस क्षेत्र बाधित झाले. अतिरिक्त पावसामुळे ऊस क्षेत्रात पाणी साचून राहिले. त्यामुळे उसाची मुळं सडली जावून उसाची वाढ खुंटली. त्यात प्रामुख्याने ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होऊन शेतकर्यांसह कारखाना देखील अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मागील वर्षीइतकाच ऊस कार्यक्षेत्रात असताना देखील कारखाना लवकरच म्हणजे मार्च अखेर बंद होईल.
- माजी आमदार भानुदास मुरकुटे अध्यक्ष, अशोक सहकारी साखर कारखाना