उसाच्या शेतात बनावट दारूचा कारखाना!

उसाच्या शेतात बनावट दारूचा कारखाना!

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील जांभळी गावाच्या शिवारात उसाच्या शेतामधे बनावट दारूची निर्मिती केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर पथकासह पाथर्डी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. या छाप्यात बनावट तयार केलेली दारू व दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा पाच लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट दारू तयार करणारा विजय बाबुराव आव्हाड (रा. जांभळी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार अनिल बडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आव्हाडला अटक केली आहे. बनावट दारू निर्मितीप्रकरणी यापूर्वीही आव्हाड याला दोन वेळा अटक केली आहे. तरीही त्याने हा उद्योग सुरूच ठेवला होता. त्याने घराशेजारीच उसाच्या शेतामध्ये बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता. याची खबर पोलिसांना लागली होती. मंगळवारी सकाळी पोलिसांनी आव्हाड याच्या बनावट दारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा मारला. तेथे 600 लीटर स्पिरीट, दोन पाण्याच्या टाक्या, लेबल, स्क्रिनपेंटींगचे मशीन, बुच लावण्याचे मशीन, विविध कंपनी लेबरच्या दारू बाटल्या असा मोठा ऐवज पोलिसांना सापडला. पोलीस आले त्यावेळी आव्हाड बनावट दारूची निर्मिती करत होता. आव्हाड याच्या विरूद्ध यापुर्वीही बनावट दारू प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. त्याने पुन्हा तोच उद्योग सुरू केल्याची माहीती पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, कौशल्यराम वाघ, पोलीस अंमलदार अनिल बडे, भगवान सानप, राहुल तिकोने, अल्ताफ शेख, देवीदास तांदळे, सागर मोहिते, भारत अंगरखे, राजेंद्र सुद्रिक, प्रतिभा नागरे, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बी. टी. घोरताळे, ए. बी. बनकर, एस. बी. विधाटे, एन. एस. उके, यु. जी. काळे, एस. व्ही. बिटके, एस. आर. आठरे, महसुलचे विजय बेरड, सदानंद बारसे, देविदास फाजगे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com