संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे साखर सहसंचालकांना आदेश
संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस तोड हार्वेस्टर खरेदी करून पूर्णपणे ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करू नयेत. तसेच दुसर्‍या जिल्ह्यातील ऊसतोड हार्वेस्टर बंद झाले आहेत, ती यंत्रणा जिल्ह्यात बोलावून भाव वाढ ऊस तोडीचे नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली साखर सहसंचालक मिलिंद भालेराव आणि साखर कारखानदारांचे प्रतिनिधी, सर्व शेतकरी संघटना व शेतकरी पक्षाचे पदाधिकारी यांची अतिरिक्त ऊस आणि ऊस वाहतूक यंत्रणा या विषयावर बुधवारी बैठक झाली. 4 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत साखर कारखानदार यांची बैठक झाली होती. या बैठकीत फक्त साखर कारखानदार यांनी त्यांची बाजू सोयीस्कर पद्धतीने जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात यशस्वी झाले होते.

परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाअध्यक्ष अभिजीत पोटे यांनी बैठकीत प्रवेश करून वस्तुस्थिती डॉ. भोसले यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी पुन्हा कारखानदारांसह साखर सहसंचालक भालेराव व सर्व शेतकरी संघटना व शेतकरी पक्षाच्या नेत्यांना बोलावली होती. बैठकीत पोटे यांनी वाहतूकदार शेतकरी बांधवांना भाववाढ द्या, उस नोंद प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणा, साखर उद्योग व इथेनॉल प्रकल्पावरील 25 किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करावे, अशी मागणी केली. आज 103 रुपये प्रति लिटर असून वाहनांचे सुटे पार्ट, टायर्स ऑइल आणि आरटीओ खर्च इन्शुरन्स ड्रायव्हरची पगार 20 हजार रुपये प्रति महिना झालेला आहे.

मात्र, साखर कारखाने ऊस वाहतूक करार करतांना या वाहतूकदारांसाठी कायदा अस्तित्वात नसताना मनमानी पद्धतीने करार करून वाहन कागद पत्रांच्या आधारे वाहन मालकांची संमती न घेता लाखो रुपये कर्ज काढून परस्पर बँक लोन सेटलमेंट करत असल्याचा आरोप करण्यात आला. कारखाना परिसरात ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून देखील कारखाने 25 किलोमीटर अंतरावरून ऊस न आणता 100 किलो मीटर पेक्षा दुरून दुसर्‍या जिल्ह्यातून ऊस वाहतूक करून ऊस आणला जातो. तर जिल्ह्यात नोंदणीकृत सात लाखांपेक्षा जास्त मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावर डॉ. भोसले यांनी उपस्थित असणार्‍या साखर कारखान्यांचे प्रतिनिधींना ऊस वाहतूक दर वाढविण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्याचे सांगितले. ऊस नोंद प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व हवाई 25 किलोमीटर अंतराची अट रद्द करण्यासाठी योग्य अहवाल शासनाकडे तातडीने पाठवत असल्याचे जाहीर केले. बैठकीला प्रहार जनशक्ती पक्ष, रघुनाथदादा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आभार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी मानले.

Related Stories

No stories found.