
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेपेक्षा अधिक उसाची लागवड झाल्याने कार्यक्षेत्रात अजुनही मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. शेतकरी कारखान्याच्या गट कार्यालयात चकरा मारुनही ऊस तोड मिळत नसल्याने यंदा गाळपाअभावी ऊस शिल्लक रहातो की काय, याचा ऊस उत्पादक शेतकर्यांना घोर लागला असून शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
श्रीरामपूर तालुक्यात चार पाच वर्षापासून होत असलेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. कार्यक्षेत्रात सुमारे 12 लाख टन ऊस गळीतासाठी उपलब्ध असल्याचा दावा नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांसह सत्ताधारी गटाकडुनही केला गेला आहे. त्या प्रमाणात अशोकची गाळप क्षमता 4 ते 4500 टनाचीच असल्याने कार्यक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. कार्यक्षेत्रात एकुण ऊसापैकी सुमारे 9 लाख टनापेक्षा आधिकची नोंद कारखान्याकडे आहे तर 2 ते अडीच लाख टन ऊसाची नोंदणीच झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
ऊस लागवड नोंदीच्या क्रमवारीनुसार तोडणी होत असल्याने सध्या टाकळीभान गटात नोहेंबर महिन्यात लागवड झालेल्या ऊसाची तोडणी सुरु आहे तर डिसेंबर महिन्यातील खोडवा ऊस पिकाची तोडणी सुरु आहे. गटनिहाय तोडणी कार्यक्रम काहीसा मागे पुढे असू शकतो. अशोकच्या माध्यमातून कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी सुरु असल्याने कार्यक्षेत्रातील ऊसाचे तोडणीपेक्षा जास्त वय झाल्याने ऊसाला तुरे फुटले असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अशोकच्या कार्यक्षेत्रात इतर कारखान्यांचा ऊस खरेदीसाठी शिरकाव होत नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ऊस शेतात उभा असल्याचे चित्र आहे. वातावरणातील उष्णता, विजेचा लपंडाव व पिकाचे वय वाढल्यामुळे पिके कोमेजुन जात आहे. त्यातच पिकाला तुरा फुटल्यामुळे ऊस पोकळ होवुन एकरी उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे.
टाकळीभान गटात थोड्या प्रमाणात युटेक शुगरच्या उसतोडी सध्या सुरु आहेत. बिगर करारदार काही प्रमाणात युटेक शुगरला ऊस देत असले तरी तोडणी मजुर कमी असल्याने पाहिजे तेवढी ऊसतोडणी होत नसल्याचे दिसून येते. कार्यक्षेत्रात अशोकचेही तोडणी मजुर कमी असल्याने ऊसतोड धिम्या गतीने सुरु आहे.
अशोकने आत्तापर्यंत 6 लाख साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. 15 मे पर्यंत तोडणी हंगाम सुरु राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून दोन महिन्यात सुमारे 4 लाख टन ऊसाचे गाळप करावे लागणार आहे. ते एक आव्हान असणार आहे. ते पेलले गेले नाही तर कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाआभावी शिल्लक राहण्याची भिती शेतकर्यांकडुन व्यक्त केली जात आहे.