बैठकांचा फार्स करुन शासन-कारखानदारांनी फसवणूक केली

साखर कामगारांची भावना
File Photo
File Photo

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी गठीत केलेल्या त्रिपक्ष समितीच्या केवळ बैठका घेण्याचा फार्स करून वेतनवाढीचा कुठलाच ठोस निर्णय न घेता गळीत हंगाम पार पाडून घेऊन राज्य शासन व साखर कारखानदारांनी फसवणूक केल्याची भावना राज्यातील साखर कामगारांमध्ये निर्माण झाली आहे.

राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीसह इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दि.12 नोव्हेंबर 2020 रोजी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे अध्यक्षतेखाली साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधी अशी त्रिपक्षीय समिती तर गठीत केली.

समितीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या. या समितीमध्ये साखर कारखानदारांचे 13 सदस्य आहेत. वरील सदस्यांपैकी माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र नागवडे, श्रीराम शेटे, बी. बी. ठोंबरे यांच्या व्यतिरिक्त इतर कारखाना प्रतिनिधींनी चारही बैठकांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविल्याचे चित्र पहायला मिळाले.

वेतनवाढीबाबत या चारही बैठकांत कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. साखर कारखानदार प्रतिनिधी तर कारखाने अडचणीत आहेत, वेतनवाढ देताच येत नाही, केवळ 2 टक्के, 5 टक्के घ्या अशा वल्गना करून बैठक गुंडाळून घेताना दिसून आले. या वर्षी राज्यातील 190 साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होते त्यापैकी सुमारे 160 कारखान्यांचे हंगाम बंद झालेले आहेत तर उर्वरित 30 एप्रिल अखेर बंद होत आहेत.

त्यामुळे साखर कारखानदारांना कामगारांच्या संपाची भीती उरलेली नाही. गोड बोलून, चर्चेत वेळ घालून हंगाम पार पाडून घेतले आणि कामगारांना वेतनवाढ न देताच वार्‍यावर सोडून दिले जात आल्याचे चित्र साखर उद्योगात पहावयास मिळत आहे. त्यामुळे साखर कामगारांमध्ये शासन, साखर कारखानदार यांचे विषयी प्रचंड चीड निर्माण होऊन कामगार आपला रोष व्हाट्सअप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत.

त्रिपक्ष समितीची मुदत सहा महिन्यांची आहे. समिती गठीत होऊन 5 महिने झालेत तरीही साखर कामगार वेतनवाढीवर निर्णय नाही. करोनामुळे एप्रिल मध्ये होणारी पाचवी बैठक अद्याप झाली नाही. सरकारच्या सर्व बैठक व साखर कारखानदारांच्या वार्षिक सभा ऑनलाईन घेऊन त्यांना पाहिजे ती कामे करून घेतात. मग त्रिपक्ष समितीची ऑनलाईन बैठक घेण्यास काय अडचण आहे? तातडीने त्रिपक्ष समितीची ऑनलाईन बैठक घेऊन येत्या 1 मे 2021 रोजी कामगार दिनी राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढीची गोड बातमी दिली पाहिजे.

-नितीन पवार त्रिपक्ष समिती सदस्य व राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com