साखरेला द्विस्तरीय भाव मिळाल्यास शेतकर्‍यांचा ऊसाला प्रतिटन 4950 रुपये भाव देणे शक्य

टास्क फोर्स शुगर कोअर कमिटीचा अभ्यासांती निष्कर्ष || केंद्र व राज्य सरकारला करणार शिफारस
साखरेला द्विस्तरीय भाव मिळाल्यास शेतकर्‍यांचा ऊसाला प्रतिटन 4950 रुपये भाव देणे शक्य

नेवासा |ता. प्रतिनिधी| Newasa

घरगुती वापराच्या साखरेला प्रतिकिलो 40 रुपये व औद्योगिक वापराच्या साखरेला प्रतीकिलो 65 रुपये असा द्विस्तरीय भावाची आपली मागणी मान्य झाल्यास शेतकर्‍यांना, साखर कारखान्यांना व सरकारला फायदा होऊन ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिटन 4950.8 रुपये भाव मिळू शकतो असा निष्कर्ष साखर उद्योगातील तज्ञांच्या टास्क फोर्स शुगर कोअर कमिटीने अभ्यासांती काढला आहे.

राज्याच्या साखर उद्योगांतील समस्यांचा अभ्यास करून राज्य व केंद्र शासनाकडे शिफारशी करण्यासाठी राज्यातील साखर उद्योगातील तज्ञ अभ्यासक फोरम ऑफ इंटलेकच्युअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख, श्रीनाथ म्हस्कोबा, साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर व नवदीप सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रतापगड व थेऊर साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक साहेबराव खामकर ह्यांच्या संयुक्तिक प्रयत्न व पुढाकारातून साखर उद्योगातील तज्ञ विजय वाबळे, अनंत निकम, के.एन कापसे, भारत तावरे, अजित चौगुले, रावसाहेब अवताडे, डॉ. दिपक गायकवाड, बाळासाहेब पठारे, डॉ. एस. एम. पवार, सीमा नरोडे, टी. पी. निकम, संजीव देसाई यांचा समावेश असलेली 15 सदस्यांची टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी स्थापन करण्यात आली होती.

या कमिटीच्या साखरेला द्विस्तरीय भाव या एकाच विषयावर पाच वेळा चर्चेच्या फेर्‍या झाल्या.अभ्यासांती केंद्र व राज्य सरकारला साखरेला द्विस्तरीय भाव मिळावा याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. या तज्ञांनी अभ्यासांती शेतकर्‍यांना प्रतिटन 4950 रुपये भाव मिळेल या दृष्टीने काही निष्कर्ष मांडले आहेत.

त्यानुसार साखरेला द्विस्तरीय भाव मिळाल्यास शेतकर्‍यांना प्रतिटन 4950.80 रुपये भाव तर एका साखर कारखान्याला 262.2 कोटी रुपये फायदा आणि सरकारच्या महसुलात प्रतिवर्षं 26 हजार 272 कोटी रुपयांची वाढ होईल असे मत या तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com