श्रीगोंदा सहकारी कारखान्यांची साखर विक्री नियमानुसारच

श्रीगोंदा सहकारी कारखान्यांची साखर विक्री नियमानुसारच

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यांने केलेली साखर विक्री ही केंद्र शासनाच्या 14 फेब्रुवारी 2019 रोजीच्या राजपत्राच्या अधिन राहूनच योग्य दराने केलेली आहे. कमी भावाने साखर विक्री केली नसल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कारवाईचा प्रश्‍नच येत नसल्याचा दावा कारखान्यांचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी केला आहे.

श्रीगोंदा कारखान्याने केंद्र सरकारच्या आदेशापेक्षा कमी भावाने साखर विक्री केली असून त्यामुळे कारखान्यांचा आठ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची तक्रार कारखान्यांच्या काही सभासदांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये श्रीगोंदो कारखान्यांचे उपाध्यक्ष भोस यांनी म्हटले आहे, साखर विक्रीबाबत केंद्र सरकारचे डोमॅस्टीक म्हणजे देशा अंतर्गत साखर विक्री करताना एमएसपी पेक्षा कमी दराने विक्री करु नये, असे आदेश आहेत. त्याप्रमाणे नागवडे कारखान्यांने अद्याप देशांतर्गत साखर विक्री करतांना एमसीपीपेक्षा कधीही कमी दराने साखर विक्री केलेली नाही.

मात्र, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये ओजीएलनूसार साखर विक्री करतांना त्यावर केंद्र शासनाचे एमएसपीचे निर्बंध नाहीत. त्यामुळे देशातील व राज्यातील साखर कारखाने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्यात्या वेळच्या इंटरनॅशनल मार्केटमधील दरानुसार साखर विक्री करत असतात त्याप्रमाणे नागवडे साखर कारखान्याने ओजीएलनुसार आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखर निर्यात केलेली आहे. यामध्ये कारखान्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. केवळ व्यक्तीद्वेषापोटी किंवा राजकिय आकसाने सभासदांनी कारखान्यांविरुध्द वारंवार शासनदरबारी खोट्या तक्रारी करु नयेत, असे आवाहन करुन भोस यांनी केले. तसेच कारखान्यांच्या कामकाजाबाबत जर कुणाची काही तक्रार असेल तर त्यांनी आगोदर कारखाना ऑफिसला यावे, प्रशासकिय अधिकार्‍यांना भेटावे, संचालकांना भेटावे जर त्यांचे निरसन झाले नाही तर पुढे जावे परंतु केवळ आकसाने संस्थेची बदनामी होईल असे कृत्य कोणीही करु नये, असे भोस यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com