देशांतर्गत साखरेचे दर वाढले तरी एमएसपी वाढवली जाणार नाही

अन्न खात्याचे सचिव सुधांशू पांडे यांचे स्पष्टीकरण
देशांतर्गत साखरेचे दर वाढले तरी एमएसपी वाढवली जाणार नाही

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

देशांतर्गत दर अधिक झाल्यामुळे साखरेच्या किमान समर्थन दरात वाढ होण्याची शक्यता अन्न खात्याचे सचिव सुधांशू पांडे यांनी फेटाळून लावली. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हंगामात साखरेची निर्यात 50-60 लाख टनापर्यंत पोहोचू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

साखरेचा सध्याचा किमान विक्री एमएसपी 31 रुपये प्रती किलो आहे.इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) 87 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सचिव पांडे यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादनाची साठवणूक करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. हरित इंधनाचे उत्पादन हा आगामी काळातील मुख्य घटक असेल.

श्री.पांडे यांनी सांगितले की, 2020-21 या हंगामात निर्यात वाढून 70 लाख टनावर पोहोचली. 2017-18 मध्ये ही निर्यात अवघ्या 6.3 लाख टन होती. यावर्षी ही निर्यात 50-60 लाख टनापर्यंत राहील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. जेव्हा साखरेच्या दराच घसरण होत होती, तेव्हा किमान विक्री दर पद्धती लागू करण्यात आली. आता साखरेचे दर वाढत आहेत.ही प्रणाली कायम राहील की नाही या प्रश्नावर ते म्हणाले, हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असेल. मात्र, सध्या एमएसपीची गरज नाही, असे पांडे यांनी स्पष्ट केले.

देशभरात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सरकारने इथेनॉल मिश्रीत पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील जीएसटीचा दर 18 टक्क्यांवरुन कमी करून 5 टक्के केला आहे. अलिकडेच सरकारने ऊसावर आधारित इथेनॉलचा दर 62.65 रुपये प्रती लिटरवरुन वाढवून 63.45 रुपये प्रती लिटर केला आहे. सी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलचा सध्याचा दर 45.69 रुपये प्रती लिटरवरुन वाढवून 46.66 रुपये करण्यात आला आहे. आणि बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलचा दर 57.61 रुपये प्रती लिटरवरून 59.08 रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com