ऊस गाळप परवाना ऑनलाईन अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत
सार्वमत

ऊस गाळप परवाना ऑनलाईन अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

Arvind Arkhade

नेवासा |Newasa

राज्यातील साखर कारखान्यांना सन 2020-21 च्या हंगामासाठी ऊस गाळप परवाना घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. विना परवानगी गळीत हंगाम सुरू केल्यास गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन प्रति दिवस एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

राज्यातील साखर कारखान्यांना दि.15 ऑक्टोबर 2020 पासून गळीत हंगाम सुरू करण्याची परवानगी मंत्री समितीने दिलेली आहे.त्यादृष्टीने साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांना गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले असून परवान्यासाठी अर्ज दाखल मुदत 01 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र साखर कारखाने अधिनियम, 1984 खंड 4 च्या आधारे कारखान्यांना गाळप परवाने दिले जातात. परवाना दिल्याशिवाय कोणताही कारखाना हंगाम सुरू करू शकत नाही.

विना परवानगी गळीत हंगाम सुरू केल्यास प्रतिटन एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही रक्कम मागील हंगामात प्रतिटन 500 रुपये होती. यावेळी ती वाढवून दुप्पट करण्यात आली आहे.

मागील सन 2019-20 या हंगामात राज्यातील 147 साखर कारखान्यांनी 545.26 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 66.61 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली होती.31 मे 2020 अखेर राज्यात मागील हंगामातील 84.31 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक आहे. ऊस उत्पदकांची एकूण एफआरपी रक्कम 13508.23 कोटी रुपये पैकी 13199.47 कोटी रुपये अदा झालेली असून 308.76 कोटी रुपये एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना देणे बाकी आहे.

मागील सन 2019-20 च्या गळीत हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज निर्मिती प्रकल्पातून एकूण 381.05 कोटी युनिट विजेची निर्मिती केली. त्यापैकी 239.48 कोटी युनिट वीज सरकारला निर्यात केली. त्यापासून साखर कारखान्याना 1465 कोटी रुपये उत्पन्न मिळलेले आहे. राज्यातील 119 आसवन्यांनी (डिस्टिलरी) एकूण 161 कोटी लिटर अल्कोहोलची तर 117 आसवन्यांनी 164.11 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती केली होती.

यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सन 2020-21 च्या गळीत हंगामासाठी राज्यात 10.66 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये ऊस लागवड झालेली आहे.या संपुर्ण ऊसाचे गाळप होण्यासाठी 185 ते 190 दिवस साखर कारखाने सुरू ठेवण्याचा अंदाज आहे.येत्या हंगामात 190-195 साखर कारखाने सुरू होतील असा ही अंदाज आहे.

एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतर अशी होणार ऊस बिलातून कपात...

1) मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रतिटन 5 रुपये

2) वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट निधी 1 रुपये प्रतिक्विंटल साखर उत्पादन.

3) महाराष्ट्र राज्य सह.साखर कारखाना संघ वर्गणी- उत्पादनातील कारखान्यांना एक रुपया प्रति क्विंटल. तर भाडे /भागिदारी तत्वावरील कारखान्यांना 70 पैसे प्रति क्विंटल. तर अत्यल्प उत्पादन वअनुत्पादित कारखान्यांसाठी 15 हजार रुपये.

4) कामगारांची देणी भागविण्यासाठी साखर विक्रीतून 50 रुपये प्रति क्विंटल कपात.

5) शासन निर्णयास अधिन राहून भाग विकास निधी ऊस दराच्या कमाल 3% किंवा रु.50/- यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढ्या मर्यादेपर्यत कपात.

6) साखर संकुल देखभाल व दुरूस्ती करीता प्रति टन 50 पैसे प्रमाणे कपात.

असा असेल 2020-21 चा हंगाम

- हंगाम घेणारे कारखाना संख्या - 190 ते 195

- ऊस नोंद क्षेत्र - 10.66 हेक्टर

- अपेक्षित ऊस उपलब्धता -1066 लाख मे.टन

- अपेक्षित साखर उत्पादन -1245 लाख क्विंटल

- अपेक्षित साखर उतारा - 11.30 टक्के

नगर जिल्ह्यात 14 सहकारी व 9 खासगी असे एकूण 23 साखर कारखाने आहेत. या गळीत हंगामासाठी जिल्हाच्या कार्यक्षेत्रातील 90 हजार हेक्टर आणि कार्यक्षेत्रा बाहेरील 20 हजार हेक्टर ऊस असा एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रातील सुमारे एक कोटी दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com