साखर कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करा
सार्वमत

साखर कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करा

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची सूचना

Arvind Arkhade

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज त्वरित मिळाले पाहिजे व अशा कर्जास हमीची आवश्यकता लागेल तर कारखान्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गाळप हंगाम 2020-21 च्या पार्श्वभूमीवर साखर संकुल पुणे येथे दि.9 रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी साखर आयुक्त सौरव राव, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व कार्यकारी संचालक संजय खताळ उपस्थित होते.

बैठकीत साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज त्वरित मिळाले पाहिजे, सदरहू कारखान्यांनी सादर केलेले प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

या हंगामात मोठ्या प्रमाणावरील संभाव्य ऊस गाळप व हंगामात सुरू होणारे साखर कारखाने, त्यांना पूर्व हंगामी, अल्प मुदतीची कर्ज मिळण्याबाबत येणार्‍या अडचणी व या कारखान्यांना शासन धोरणानुसार अशा कर्जाला द्यावी लागणारी हमी याबाबत कोणती कार्यवाही चालू आहे याचा सविस्तर आढावा यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com