राहुरी, साजन वगळता उद्यापासून 21 कारखान्यांचे बॉयलर पेटणार!

गळीत हंगाम || यंदा उसाची पळवापळवी होण्याची शक्यता
साखर कारखाना
साखर कारखाना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका यंदा जिल्ह्यातील साखर कारखान्यांना बसणार असल्याचे चित्र आहे. मागणीच्या तुलनेत यंदा कमी ऊस असल्याने ऐनवेळी उसाची पळवापळवी होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून (उद्यापासून) जिल्ह्यातील 23 पैकी 21 साखर कारखान्यांचे बॉयलर पेटणार असून यात राहुरीचा तनपुरे आणि श्रीगोंद्याचा साजन साखर कारखान्याने अद्याप गाळप परवान्यांसाठी अर्जच केलेला नाही. यामुळे हे कारखाने यंदा सुरू होणार असल्याची महिती आहे.

दिवाळीची चाहूल लागताच राज्यातील साखर कारखान्यांना गाळप हंगामाचे वेध लागतात. राज्यात सहकार तत्त्व, भाडेपट्टा आणि खासगीरीत्या चालविल्या जाणार्‍या साखर कारखान्यांचे बॉयलरही दसर्‍याच्या आसपास पेटत असतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही गाळपाचे उद्दिष्ट जाहीर करत हंगाम यशस्वी करण्याची तयारी केली आहे. राज्यातील पश्चिम पट्ट्याच्या तुलनेत यंदा नगर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र कमी आहे. नगर जिल्हा ही सहकाराची पंढरी असून सहकारी साखर कारखाने या पंढरीतील सहकाराचे मंदिर आहेत. मात्र, यातील अनेक मंदिरांना कुलूप लावण्यात आले असून त्याजागी खासगी साखर कारखाने सुरू करून त्याव्दारे ऊसाचे गाळप करण्यात येत आहे.

पूर्वी साखर कारखान्यांना ऊसाच्या गाळपासाठी झोन ठरवून दिलेले होते. मात्र, आता राज्यातील साखर कारखान्यांची झोन बंदी उठवण्यात आलेली असून राज्यात कोणी कोणत्याही भागातून ऊस गाळपासाठी नेवू शकणार आहे. मात्र, लांबून ऊस आणून त्याचे गाळप करतांना उत्पादन खर्च वाढणार असल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे जवळील ऊस पळवण्यावर प्रत्येक कारखान्यांचा भर राहणार आहे. यामुळे ऊस गाळपात स्पर्धा राहणार असून यामुळे अप्रत्यक्षात ऊसाची पळवापळवी होणार आहे. ऊसाच्या नगर विभागात नाशिक आणि नगर जिल्ह्याचा समावेश असून या दोन जिल्ह्यात 28 सहकारी आणि खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यातील दोघांचा अपवाद वगळता अन्य सर्व साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे गाळपासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे. जवळपास यातील सर्व कारखान्यांना गाळप परवाना मिळणार असल्याचे साखर प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यात यंदा गाळपासाठी 1 लाख 68 हजारवर हेक्टवर ऊसाचे क्षेत्र असून गतवर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र कमी आहे. याशिवाय यंदा घटलेले पर्जन्यमान याचा फटका ऊस पिकाला बसणार असून त्याचा साखर उतार्‍यावर परिणाम संभावतो. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 कोटी 25 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप झालेले होते. पूर्वीपासून जिल्ह्यातील साखर कारखानदारीसाठी नगर जिल्हा स्वयंपूर्ण असून अपवाद वगळता शेजारच्या जिल्ह्यातून कमी अधिक प्रमाणात ऊस आणण्यात येतो. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील काही कारखाने नगर जिल्ह्यातील ऊसावर अवलंबून आहेत.

ऊसाची उपलब्धता कमी असल्याने यंदा एफआरपी इतका दर देऊन त्यावर आणखी दर वाढवून देण्याची तयारीही प्राथमिक टप्प्यात काही कारखान्यांची दिसते आहे. कारखान्यास गाळपासाठी वाहतुकीच्यादृष्टीने नजीकच्या परिसरातील ऊस अपेक्षित असतो. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतक्या कमी क्षमतेच्या कारखान्यांशी स्पर्धा करण्यास जास्त क्षमता असलेले जिल्ह्यातील कारखानेही ऊस खरेदीच्या स्पर्धेत उतरणार असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे साखर निर्यातबंदी करूनही दर उतरण्यास तयार नाही. त्यामुळे यंदा उसाला साखर कारखान्यांनाही भाव द्यावा लागणार आहे. एफआरपी दरांमध्ये अधिक दर मिळवून उसाला अपेक्षित दर मिळाल्यास यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करणार्‍या बळीराजाला थोडासा दिलासा यामुळे मिळू शकणार आहे.

नगर जिल्ह्यात 13 सहकारी साखर कारखाने असून 10 खासगी कारखाने आहेत. एकेकाळी नगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांची पंढरी होती. मात्र, काळाच्या ओघात सहकारी साखर कारखान्यांची जागा आता खासगी कारखाने घेत असून अनेक सहकारी कारखाने आजही तोट्यात आहेत. यामुळे भविष्यात सहकारी कारखान्यांची जागा खासगी कारखाने घेणार असल्याचे चित्र दिसत आहे.

यांनी केले ऑनलाईन अर्ज

नगर जिल्ह्यातील अगस्ती, विखे पाटील, काळे, कोल्हे, क्रांजी शुगर, अशोक, प्रसाद, कुकडी, नागवडे, संपतराव ढसाळ, वृध्देश्वर, अंबालिका, थोरात, पियुष, कृषीनाथ अ‍ॅग्रो, मुळा, गणेश, गजानन (युटेक), ज्ञानेश्वर, गंगामाई आणि श्रीराम या कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com