साखर कारखान्यांनी उसाचे पेमेंट तातडीने द्यावे

राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी
साखर कारखान्यांनी उसाचे पेमेंट तातडीने द्यावे
साखर कारखाना

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

ऊस तुटून जाऊन ज्या कारखान्यांनी आजपर्यंत शेतकर्‍यांचे पेमेंट केलेले नाही, त्या कारखान्यांना त्वरित पेमेंट देण्याचे आदेश करावेत, अशी मागणी राहुरीतील शेतकर्‍यांच्या वतीने जिल्हा उपनिबंधक, प्रादेशिक सहसंचालक अहमदनगर व जिल्हा बँक चेअरमन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कारखान्यात ऊस गेल्यावर वास्तविक 14 दिवसांच्या आत पेमेंट करणे बंधनकारक असताना अनेक कारखान्यांनी एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांना न दिल्याने शेतकर्‍यांनी काढलेल्या कर्जावर व्याजाचा भुर्दंड बसत असून मार्चअखेर शेतकरी थकबाकीत जाणार आहेत. तसेच ज्या शेतकर्‍यांचा ऊस मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आला, त्यांना त्वरित दोन दिवसात पेमेंट वर्ग करून शेतकर्‍यांना बिनव्याजी सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम एकरकमी देणे बंधनकारक असताना प्रादेशिक सहसंचालक यांनी कारखान्याशी समन्वय ठेवून शेतकर्‍यांना पंजाबराव देशमुख कर्ज योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच ज्या शेतकर्‍यांची ऊस नोंद ज्या कारखान्यांकडे आहे, त्या कारखान्यांनी व शेतकर्‍यांची ऊसतोडणी त्वरीत करण्याची जबाबदारी असताना कारखाने ऊस जास्त झाल्यामुळे तोडणी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याबाबतही संबंधित कारखान्यांना आदेश देऊन सर्व ऊस तोडणीचे नियोजन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर संजय पोटे, नामदेव जगताप, संजय जाधव, भारत थोरात, चंद्रभान ठुबे, बाबुलाल पठाण, राजेंद्र पठारे, संभाजी पोटे, रवींद्र आढाव, रावसाहेब चूळभरे, शिवराम काळे, ज्ञानदेव पोटे, बाबुराव बकरे, रमेश कोकाटे, गंगाधर जरे, ताराचंद बनकर, शिवाजी टेकाळे, दत्तात्रय आढाव आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. याबाबत प्रादेशिक संचालकांनी तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी 31 मार्चपर्यंत सर्व पेमेंट न झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाचा मार्ग अवलंबतील, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.