43 साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना रोखला

नगर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश
43 साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना रोखला
File Photo

पुणे |प्रतिनिधी|Pune

ऊसाची पूर्ण रास्त व किफायतशीर रक्कम (एफआरपी) न देणार्‍या राज्यातील 43 साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाना नाकारण्यात आला आहे. यामध्ये भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे. शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्यानं परवाने रोखण्यात आले आहे. संबंधित कारखान्यांनी दिवाळीपर्यंत एफआरपी न दिल्यास त्यानंतर व्याजासह एफआरपी वसूल करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.

राज्यात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या गाळप हंगामाला दसर्‍याच्या मुहूर्तावर (15 ऑक्टोबर) सुरुवात झाली. यंदा 194 कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली. आतापर्यंत 54 कारखान्यांत गाळप सुरू झाले आहे. मात्र 43 कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.

राज्यात अनेक साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरुवात झालीय. अशावेळी एकरकमी एफआरपीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी भाजप नेत्यांना मोठा दणका दिला आहे. ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी अजूनही 43 साखर कारखान्यांना परवानाच दिलेला नाही. या 43 साखर कारखान्यांनी मिळून शेतकर्‍यांची 300 कोटींची एफआरपी थकवली आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांचे पैसे दिले जाणार नाहीत, तोवर गाळप परवाना मिळणार नसल्याचं साखर आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. परवाना रोखण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये भाजपच्या नेत्यांसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.

गेल्या गाळप हंगामात 154 कारखान्यांनी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत 100 टक्के एफआरपी दिली. चालू गाळप हंगामात आतापर्यंत 54 साखर कारखाने सुरू झाले आहेत. अनेक कारखान्याच्या संचालकांनी आर्थिक अडचणींमुळे तसेच तांत्रिक दुरुस्तीमुळे गाळप हंगामास सुरुवात केलेली नसून येत्या आठवडाभरात उर्वरित कारखान्यांमधील गाळप हंगामास सुरुवात करण्यात येईल, असे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना शेतकर्‍यांचे पैसे देणार नाहीत तोपर्यंत परवाना दिला जाणार नाही. ऊस बिलाचे चेक शेतकर्‍यांना दिले. मात्र, चेक बाऊन्स झाल्याची तक्रार शेतकर्‍यांनी साखर आयुक्तांकडे केलीय. त्यावर घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे. शेतकर्‍यांनी मंगळवारी कारखान्यावर आंदोलन केलं होतं.

भाजपच्या या नेत्यांच्या कारखान्यांचा गाळप परवाना रोखला

पंकजा मुंडे - वैद्यनाथ कारखाना

रावसाहेब दानवे -रामेश्वर कारखाना

हर्षवर्धन पाटील - इंद्रेश्वर आणि कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना

राधाकृष्ण विखे पाटील - राहुरी कारखाना

धनंजय महाडिक - भीमा-टाकळी कारखाना

समाधान आवताडे - संत दामाजी कारखाना

संजय काका पाटील - यशवंत कारखाना आणि एस जी झेड, तासगाव

बबनराव पाचपुते - साईकृपा कारखाना

शिवसेनेच्या या नेत्यांच्या कारखान्याचा परवाना रोखला

तानाजीराव सावंत - भैरवनाथ शुगर

कल्याणराव काळे - चंद्रभागा कारखाना

दिग्वीजय बागल - मकाई कारखाना

दिलीप माने (माजी काँग्रेस आमदार) - सिद्धनाथ कारखाना

Related Stories

No stories found.