करोना : साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना मार्गदर्शक सूचना जारी

साखर कारखाना
साखर कारखाना

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्यातील साखर कारखान्यांचा सन 2020-21 चा हंगाम सुरू होत असून आणि तो पुढील वर्षाच्या मे महिन्यापर्यंत

चालण्याची शक्यता असल्याने कारखान्यांचे अधिकारी-कर्मचारी, साखर कामगार, ऊसतोड मजुरांना व वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना करोनापासून संरक्षण मिळणेसाठी आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय करणेसाठी साखर आयुक्तालयाने राज्यातील सर्व साखर कारखान्यांना सर्वंकष अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकात कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, हंगामी कर्मचारी यांची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.

कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कामकाजाच्या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राहील, याची काळजी घ्यावी.

अधिकारी,कर्मचारी यांनी मास्क धारण करणे आवश्यक असून मास्कचा व हँड सॅनिटायझरचा पुरेसा पुरवठा कारखान्याने करावा. तसेच करोनावरील गोळ्या, औषधे पुरेसे उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.

अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी ठराविक कालावधीनंतर करण्यात यावी. संशयित व्यक्तींचे त्वरित विलगीकरण करणे, क्वारंटाईन करणे याबाबतची कार्यवाही सत्वर करावी.

कर्मचार्‍यांची ने-आण करणार्‍या वाहनांमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर ठेवावे. कामकाजाची जागा सातत्याने सॅनिटाईझ करण्यात यावी.

ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार व त्यांच्याबरोबर असलेल्या व्यक्तिची काळजी घेणेबाबत-

ऊसतोड मजुरांना, वाहतूक कामगारांना व त्यांच्याबरोबर असणार्‍या व्यक्तींना पुरेशा हँड सॅनिटायझरचा पुरवठा करावा. सर्वांनी सुरक्षित सामजिक अंतर ठेवण्याबाबत त्यांना सूचना द्याव्यात. मास्कचा पुरेसा पुरवठा करावा.

सर्व ऊसतोड मजुरांची, वाहतूक कामगारांची आरोग्य तपासणी ठराविक कालावधीनंतर करण्यात यावी. संशयित व्यक्तींचे त्वरित विलगीकरण करणे / क्वारंटाईन करणेबाबतची कार्यवाही सत्वर करावी.

साखर कारखान्यांनी हंगामाच्या तीन टप्प्यात आरोग्य शिबिर आयोजित करावीत.पहिले शिबिर - गाळप हंगाम सुरू झाल्यापासून पहिल्या पंधरा दिवसांत, दुसरे शिबीर - गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांत, तिसरे शिबिर - गाळप हंगाम संपतेवेळी आयोजित करावे.

कारखाना स्थळी किमान 25 बेडचे रुग्णालय उभारण्यात यावे व त्यामध्ये किमान 5 ऑक्सिजन बेड-केटीलेटर असावेत. रुग्णालय परिसर व ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार राहत असतील त्या ठिकाणी पुरेशी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व इतर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. ज्या ठिकाणी कायमस्वरुपी स्वच्छतागृहे बांधणे शक्य नसेल त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची स्वच्छतागृहे, फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी.

कारखान्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी, हंगामी कर्मचारी तसेच ऊसतोड मजूर व वाहतूक कामगार आणि त्यांच्याबरोबर असलेल्या व्यक्तींची हंगाम कालावधीत करोनापासून पुरेसे संरक्षण घेण्यासाठी योग्य ती काळजी कारखान्यांकडून घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com