दोन दिवस ऊसतोड बंद ठेऊन आंदोलनास सहकार्य करा

अन्यथा बेमुदत ऊसतोड बंद || ‘स्वाभिमानी’चा साखर कारखान्यांना इशारा
दोन दिवस ऊसतोड बंद ठेऊन आंदोलनास सहकार्य करा

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक मागण्या साखर आयुक्तांच्या मार्फत केंद्र व राज्य सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांवर केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 17 व 18 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचे राज्यव्यापी लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन पुकारले असून त्यास साखर कारखान्यांनी सहकार्य करावे अन्यथा बेमुदत ऊस तोड बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी या आंदोलनासाठी सहकार्य करावे. त्यांनी ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदार तसेच शेतकर्‍यांवर दबाव टाकू नये, अन्यथा हे दोन दिवसांचे लाक्षणिक आंदोलन सोडून बेमुदत ऊसतोड बंद केली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.

संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या 21 व्या ऊसपरिषदेत ऊस उत्पादक शेतकर्‍यांची न्याय हक्कासाठी सरकारकडे मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांवर राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे झालेल्या ऊस परिषदेत शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

शेतकर्‍यांच्या या मागण्यांचे निवेदन पुणे येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयांवर मोर्चा नेऊन त्यांना दिले. या मागण्यांतील साखर आयुक्तांनी विचार करून दुसरीकडून वजन करून आणलेले ऊस वजन ग्राह्य धरण्याचे आदेश कारखान्यांना दिले व पुढील वर्षापासून सर्व कारखान्यांचे ऊस वजनकाटे ऑनलाईन होतील, असे जाहीर केले.

दोन दिवसांचे हे आंदोलन राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असून यात शेतकर्‍यांची एकजूट दिसणे गरजेचे आहे. संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना रवींद्र मोरे व त्यांचे सहकारी प्रत्यक्ष जाऊन निवेदन देत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com