राहुरीच्या पूर्वभागात तुर्रेदार उसामुळे शेतकरी धास्तावले

वजनात होणार घट || ऊस तोडणीसाठी मजुरांचीही चालढकल
राहुरीच्या पूर्वभागात तुर्रेदार उसामुळे शेतकरी धास्तावले

वळण |वार्ताहर| Valan

‘फड सांभाळ तुर्‍याला ग आला,’ या मराठमोळ्या लावणीची आठवण राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात उसाला आलेल्या तुर्‍याकडे पाहून होत आहे. पूर्वभागातील अनेक उसाच्या फडात तुर्रेदार ऊस वाढल्याने आता उसाच्या उत्पादनात घट होणार असून त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

अतिवृष्टी व ढगाळ हवामानामुळे बहुतांश उसाला तुरे आल्याचे जुन्याजाणत्या शेतकर्‍यांनी सांगितले. सीताराम गोसावी म्हणाले, सध्या ढगाळ वातावरणामुळे उसाला तुरे आले आहेत. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. रोहिदास आढाव म्हणाले, सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकरी नगदी पीक म्हणून उसाकडे पाहतोय. पण थंडीतच पाऊस आणि पावसातून थंडी अशी परिस्थिती असल्यामुळे उसाला तुरे आले आहेत. सुदामराव शेळके म्हणाले, साखर कारखान्यांनी आपल्याजवळचा ऊस तात्काळ गाळपाला न्यावा, अन्यथा उसाच्या वजनात घट होऊन शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. आत्ता सध्या ऊस तोडणी करीता शेतकरी हतबल झाला आहे.

मागील जून ते सप्टेंबरदरम्यान, राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. अतिरिक्त पाऊस आणि त्यातच ढगाळ हवामान त्यामुळे उसाच्या फडात तुर्रेदार ऊस वाढू लागला. हे तुुर्रे पाहून शेतकरी धास्तावले आहेत. तुर्‍यामुळे उसाचे वजन घटते, त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो. चार्‍यासाठीही हा ऊस उपयोगी नसल्याने ऊस तोडणी करण्यास मजूर चालढकल करतात. यामुळे सध्या ऊस उत्पादक चिंतेत आहेत. उसाला लवकरात लवकर उसतोड मिळावी, यासाठी शेतकर्‍यांचा आटापिटा सुरू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com