
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
आढळगाव येथील सुभेदार हनुमंत दगडू काळे (वय 41) यांच्यावर देवनदी तिरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभेदार काळे व त्यांचे मित्र दत्तात्रय पोपट काळे (वय 42) हे पुणे येथे सरकारी कामासाठी गेले होते. पुण्यात त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, काळे याना भारतीय सैन्य दल आणि जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर आढळगाव येथील देवनदी तिरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.आढळगाव येथील हनुमंत दगडू काळे हे भारतीय सैन्य दलात उत्तराखंड येथिल अलमोडा येथे 22 राजकोट बटालियनमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. पुढील वर्षी ते सैन्य दलातून निवृत्त होणार होते. शुक्रवारी (दि.5) दुपारी त्यांच्या सैन्य दलाच्या कामानिमित्त मित्र दत्तात्रय काळे यांच्यासह पुणे येथे जातांना एका चौकात त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली.
यात दोघे ही जागीच ठार झाले. शुक्रवारी अकरा वाजता आढळगावमध्ये दोन्ही मित्रांचे पार्थिव आणले. सुभेदार हनुमंत काळे यांची गावातून भारतीय सैन्य दलाच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. सुभेदार काळे यांना आ. बबनराव पाचपुते, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तहसीलदार मिलिंद कुलथे, माजी आ. राहुल जगताप व सैन्य दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
जिल्हा पोलीस दल आणि भारतीय सैन्य दलाचयावतीने हवेत फायर करून मानवंदना देण्यात आली. यावेळी गावासह परिसरातील माहिला, पुरुष, नातेवाईक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सुभेदार काळे यांच्या मागे आई, वडील, भाऊ, भावजई, मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.