लसीकरणादरम्यान पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात गैरप्रकार

चौकशीची मागणी : रॅपिड किटद्वारे पैसे घेऊन कोव्हिड तपासणी सुरू
लसीकरणादरम्यान पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात गैरप्रकार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

येथील उपजिल्हा रुग्णालयातील करोना लसीकरण केंद्रावर सावळागोंधळ सुरू आहे.

याठिकाणी वशिला, राजकीय दबाव व गाव पातळीवरील ओळखीचा फायदा घेत वयाच्या अटीत बसत नसतानाही लसीकरण करून घेणार्‍यांमुळे रांगेत उभे राहणार्‍या पात्र, गरजू व सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असून या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयात शासकीय लसीकरण केंद्र असून सकाळपासूनच तेथे नंबर लागतात. रांगेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नाही. सर्व गरजू नागरिक एकमेकांना अगदी चिकटून उभे राहत असून येणार्‍यांसाठी दर्शनी भागावर सॅनिटायझर नाही. मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी नाहीत. दालन क्रमांक पाचमध्ये रुग्ण तपासणी होते. दालन क्रमांक सहामध्ये करोना लसीची नोंदणी करावी लागून क्रमांक 16 मध्ये प्रत्यक्ष लस द्यावी लागते. सोमवारी दालन क्रमांक पाचमध्ये अत्यवस्थ रुग्ण बेडवर होता.

दाराबाहेर लसीकरणाची रांग लागली होती. नंबर वरून रेटारेटी गोंधळ वाढत जाऊन नोंदणी करणार्‍या एका गुरुजीने रांग लावण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या निर्देशानुसार वय वर्षे 45 पेक्षा कमी वयाच्या नागरिकांना लस देऊ नये, मात्र येथील केंद्रावर तसा कोणताच नियम पाळला जात नाही असे सांगून आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड म्हणाले पात्रता निकषांमध्ये बसत नसतानाही कमी वयाच्या राजकीय पदाधिकार्‍यांनी लस घेऊन सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले.

यामध्ये भाजपचे विशेषत: आमदारांचे निकटवर्तीय जास्त आहेत. रॅपिड टेस्टचे किट गावात आणून विशिष्ट रक्कम घेऊन कोव्हिड टेस्ट सर्रास केली जाते. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर त्याला खासगी पॅकेजमध्ये डॉक्टरकडून उपचार घेण्यास सांगितले जाते. या बाधितांची कुठेही नोंद नसते. रॅपीड किट कुठून मिळते याची सखोल चौकशी झाल्यास रुग्णांना गंडवणारी साखळी उघड होणार आहे, असे आव्हाड म्हणाले. तसेच राजेंद्र दुधाळ यांनी सुद्धा लसीकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पालिकेच्या पदाधिकार्‍यांना काही मिनिटांत लस कशी मिळते, कर्मचारी नेमके कोणाच्या दबावाखाली काम करतात?असा प्रश्न उपस्थित केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com