उपजिल्हा रुग्णालय मंजुरी श्रेयासाठी श्रीरामपुरात स्पर्धा

उपजिल्हा रुग्णालय मंजुरी श्रेयासाठी श्रीरामपुरात स्पर्धा
Hospital

आमच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच प्रश्न मार्गी; कुणीही श्रेय घेऊ नये - आ. कानडे

आज विस्तारीत इमारतीचा पायाभरणी समारंभ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आ. लहू कानडे यांनी त्यांच्या निधीमधून 30 लाख रुपये ग्रामीण रुग्णालयासाठी दिले आणि 30 बेड असणारे हे रुग्णालय 50 बेडचे केले. तसेच सर्वच्यासर्व बेड्सना ऑक्सीजन सुविधाही निर्माण करून दिली. या सर्व प्रयत्नामुळेच श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर असे करण्यात आले. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून सततच्या पाठपुराव्यामुळे मान्यता मिळाली असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविण्यासाठी कोणीही श्रेय घेऊ नये, असा टोला आ. लहू कानडे यांनी लगावला आहे. आज शुक्रवार दि. 11 जून रोजी सदर इमारतीचा पायाभरणी समारंभ संपन्न होत आहे.

वास्तविक 17 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयामध्येच 30 खाटांवरून 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णय क्र. 20 20 /प्र.क्र. 44 आरोग्य/ 3 नुसार 7 जून रोजी पारित करण्यात आला आहे.

करोना महामारीचा संसर्ग वाढत गेला. यासाठी शेतकरी, कामगार व गरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत म्हणून त्यांनी येथे जास्तीत जास्त खाटा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयाला आमदार निधीमधून कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मंजूर केली. दीड कोटी रुपये खर्चाचा ऑक्सीजन प्लांट मंजूर करून आणला. विजेअभावी तो बंद पडल्यास त्याला बॅकअप म्हणून आमदार निधीमधून 20 लाख रुपये देऊन 200 केव्हीचे जनरेटर आमदार निधीमधून दिले आहे. तसेच या 50 बेड व्यतीरिक्त अधिक 75 बेड वाढविण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाला विस्तारीत इमारतही मंजूर करून घेतली आहे. त्यासाठी देखील आमदार निधीमधून आ. कानडे यांनी निधी मंजूर केला आहे. आज शुक्रवार दि. 11 जून रोजी सदर इमारतीचा पायाभरणी समारंभ संपन्न होत आहे. त्या इमारतीमध्ये नव्याने करोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुकाबला करता यावा म्हणून 75 ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात येणार आहे. त्यापैकी 25 बेडचे लहान मुलांसाठीचे करोना उपचार केंद्र असेल.

ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाल्याने नव्याने शासनाने नवीन 20 पदे निर्माण केली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी बधीरीकरण, वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र, वैद्यकिय अधिकारी भिषक, वैद्यकिय अधिकारी बालरोग तज्ञ इत्यादींचा समावेश आहे. तसेच 5 नवीन अधीपरिचारीकांची पदेही मंजूर झालेली आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, व्रणोपचारक, औषध निर्माण अधिकारी, कक्ष सेवक, अशा पदांचा समावेश करण्यात आला आहे. पुरेशा संख्येने मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूरही खर्‍या अर्थाने सक्षम अशी सरकारी आरोग्य व्यवस्था निर्माण झाली आहे.

आ. लहू कानडे यांनी सदरचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत. तर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी आ. लहू कानडे यांचे श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून सततच्या पाठपुराव्यामुळे मान्यता मिळविल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

आदिकांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा राष्ट्रवादीचा दावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील ग्रामीण रुग्णालयास(श्रेणी वर्धीत) उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी मिळाली असून यासाठी नव्याने 20 पदांची भरती करण्यात येणार आहे उपजिल्हा रुग्णालय पुणे साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी 4 फेब्रुवारी 20 20 रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती अविनाश आदिकांच्या पत्राची दखल घेत आरोग्य मंत्री टोपे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणी वर्धन होऊन 20 पदांना मंजुरी दिली असल्याचा दावा आदिक समर्थकांनी केला आहे.

श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन होऊन पदे भरणे करिता मंजुरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे 4 फेब्रुवारी 2020 रोजी केली होती. या मागणी बरोबरच ग्रामीण रुग्णालयात शेजारील तलावातून व कॅनॉलमधून पाणी झिरपून परिसरात दलदल होते. त्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीस धोका निर्माण होऊ शकतो, परिसरात पेवर ब्लॉक बसून काँक्रिटीकरण तसेच आता उपजिल्हा रुग्णालय झाल्यास त्यासाठी इमारतीचे विस्तारीकरण करण्यात यावे, विद्युत जनित्र खरेदीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी आदिक यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे केली. यासाठी आदिकांनी वारंवार पाठपुरावा करून उत्तर नगर जिल्ह्यात पहिलेच उप जिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यामुळे शासन निर्णय क्र. 2020 /प्र.क्र. 44 आरोग्य/ 3 नुसार 7 जून रोजी पारित करण्यात आला आहे.

या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने स्वतंत्र रक्तपेढी, बाल रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, सहाय्यक आधी सेविका, परी सेविका, औषध निर्माण अधिकारी अशी विविध 20 पदे ही आरोग्यमंत्र्यांनी मंजूर केली आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com