अभ्यासासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी

नगरच्या शाळेतील शिक्षकांचे सामाजिक अंतर राखून अध्यापन
अभ्यासासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे यंदा शाळा अद्याप लॉकडाऊनच आहेत. त्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबला जात आहे. पण ज्या पालकांकडे स्मार्टफोन व ऑनलाईन शिक्षणासाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.

मनपाच्या केडगाव येथील ओंकारनगर प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. पण काही पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. काही पालकांकडे नेट नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी या शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गटागटाने विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत.

जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात आवश्यक सुविधेअभावी सहभागी होऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी छापील अभ्यास तयार केला आहे. हा छापील अभ्यास विद्यार्थ्यांना घरी जाऊन सर्व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून शिक्षक सोडवण्यास मदत करतात. शिक्षकांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मदत होत आहे.

विद्यार्थ्यांना आठवड्याचा अभ्यास दिला जातो व पुढील आठवड्यात तो तपासून पुन्हा नवीन अभ्यास दिला जातो.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात येणार्‍या अडचणी दूर झाल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचा नियमितपणे अभ्यास सुरू आहे. तसेच शिक्षक विद्यार्थी व पालकांची करोनाबाबत जनजागृती करत आहेत.

ओंकारनगर शाळेतील शिक्षक राबवित असलेल्या या उपक्रमाचे मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, केंद्रसमन्वयक चंद्रशेखर साठे, विषयतज्ज्ञ अरुण पालवे यांनी कौतुक केले आहे.

लॉकडाऊन काळामध्ये सर्व शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा वापर सध्या शाळा करत आहेत. शिक्षक व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून, झूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. परंतु असे काही विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आहेत की त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत किंवा नेटची सुविधा नसल्याने त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून शिक्षकांनी सामाजिक अंतर ठेवून व सर्व सुरक्षा उपायांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम उल्लेखनीय आहे. यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.

- सुभाष पवार, प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण.

आम्ही वीटभट्टीवर मजुरी करतो. ओंकारनगर शाळेतील शिक्षक आमच्या मुलांसाठी विविध उपक्रम राबवतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शिक्षक नियमितपणे आमच्या संपर्कात आहेत.ऑनलाईन शिकवण्याबरोबरच मुलांना छापील अभ्यास दिला आहे. शिक्षक मुलांना एकत्र करून त्यांना अभ्यासासाठी मदत करत आहेत. तसेच लॉकडाऊन काळात शाळेतील शिक्षकांनी आम्हाला स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने किराणा व भाजीपाला उपलब्ध करून दिला.

- सचिन ढावरे (पालक)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com