निर्णयक्षम व कल्पक विचारातून विद्यार्थ्यांनी उद्योजकीय भविष्य घडवावे - विक्रम सारडा

निर्णयक्षम व कल्पक विचारातून विद्यार्थ्यांनी उद्योजकीय भविष्य घडवावे - विक्रम सारडा

संगमनेर (प्रतिनिधी)

विद्यार्थीकाळ हा खरं जीवन घडण्याची प्रक्रिया आहे. ध्येय बाळगा, त्यासाठी कठोर मेहनत घ्या. अवघड काम आधी करा. निर्णय घ्या. निर्णयावर ठाम रहा. आयुष्यात स्वप्न पाहताना ते अंमलात कसं आणता येईल याचा विचार करा. आपलं मन आनंदी ठेवलं तरच यशस्वीतेकडे खरी वाटचाल होईल. उद्योजकीय क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी विद्याथ्र्यांनी नाविन्यपूर्ण, कल्पक व प्रगल्भ वैचारिक पातळी वाढविली पाहिजे, असे प्रतिपादन दै. सार्वमत देशदूत समूहाचे चेअरमन विक्रम सारडा यांनी केले.

संगमनेर महाविद्यालयात आयोजित वाणिज्य महोत्सव पारितोषिक वितरण व समारोप प्रसंगी श्री. सारडा बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, पदव्युत्तर विभाग प्रमुख प्रा. एल. बी. मालुसरे, वाणिज्य महोत्सवाच्या कार्याध्यक्षा प्रा. सारिका पेरणे उपस्थित होते. श्री. सारडा म्हणाले, सामान्य लोकांचे विचार जिथे संपतात, उद्योजकांचे विचार तेथून पुढे सुरू होतात. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, सातत्यपूर्ण प्रयत्न व योग्य निर्णयक्षमतेची जोड हवी, ध्येयपूर्तीसाठी फक्त जिद्द व चिकाटी अंगी बाळगा, तुमच्या भविष्याला योग्य दिशा मिळेल. उद्योजकीय क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण, कल्पक व प्रगल्भ वैचारीक पातळी वाढविली पाहिजे. सकारात्मक व दूरदृष्टीकोनातून येणारी आव्हाने व संधी ओळखायला हव्या, त्यासाठी विद्यार्थी दशेतच कुशल व सक्षम नेतृत्वगुण अंगी रुजवा. निर्णय घ्यायला शिका, जे काही ठरवाल ते योग्य वेळी ठरवा, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, याची काळजी घ्या.

कुणाच्या पसंती किंवा ना पसंतीवर निर्णय घेऊ नका. आपला निर्णय आपणच खंबीरपणे घ्या. कारण तो निर्णय तुमच्या आयुष्यभरासाठी असेल, असे सांगत ते म्हणाले, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानले पाहिजे. विविध क्षेत्रांतून चांगले विद्यार्थी घडावेत या हेतूने संगमनेर महाविद्यालयाची स्थापना झाली. देणगीतून महाविद्यालयाच्या इमारती उभ्या राहिल्या. विद्यार्थ्यांसाठी उत्तम मैदान असावं, सर्वगुण संपन्न विद्यार्थी बाहेर पडावे, यासाठी ५० वर्षांपूर्वी ज्यांनी हा दृष्टीकोन ठेवून ज्ञानदानाचे हे कार्य सुरु केले ते कौतुकास्पद आहे. संगमनेर महाविद्यालय स्वायत्त झाले याचा आनंद आहे. येथील २०० विद्यार्थी पीएचडी करतायेत ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.

शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी म्हणाले, संगमनेर नगरपालिका, सारडा परिवार, क्षत्रिय परिवार यांच्या भरीव योगदानामुळे संगमनेर महाविद्यालय उभे राहिले. आजच्या फेस्टीव्हल निमित्ताने स्वायत्त झालेल्या संगमनेर महाविद्यालयाला देखील क्रेडीट मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अडचणींवर मात करण्याची शिकवण याच महोत्सवातून मिळणार असल्याचे सांगत ते म्हणाले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी वाणिज्य विभागाच्या प्रगतीचा आलेख मांडला व महोत्सवाचा हेतू विषद केला. वाणिज्य महोत्सवाच्या कार्याध्यक्षा प्रा. सारिका पेरणे यांनी अहवाल वाचन केले.

यावेळी विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वाणिज्य विभागातील अभिनव स्पर्धेत मिस्टर कॉमर्स म्हणून विश्वकर्मा साहिल लालचंद व मिस कॉमर्स म्हणून ऋतुजा शाम कुर्डे यांना सन्मानित करण्यात आले. बेस्ट कॉमर्स स्टुडंट ऑफ द इयर पुरस्काराने अंजुषा कासार हिला गौरविण्यात आले. तिला प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत व पवार सायकलचे संचालक गोकुळ पवार यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. हेमलता तारे व प्रा. शहाजी लेंडे यांनी केले. आभार प्रा. ए. जी. गोसावी यांनी मानले. यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com