अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

23 नोव्हेंबरपासून नगरसह राज्यातील नववी ते बारावी शाळा सुरू झाल्या आहेत. याला आता जवळपास 2 महिने लोटले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती

केवळ 35 टक्क्यांच्या आतच म्हणजेच 91 हजार 248 आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रम पूर्ण कसा करावा, असा पेच शिक्षकांसमोर आहे. त्यातच आता 27 तारखेपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असून त्यांच्या अभ्यासक्रमासोबत शाळेतील उपस्थितबाबत अद्याप संभ्रामावस्था आहे.

नगरसह राज्यात करोनाची स्थिती हळूहळू कमी झाल्यानंतर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील या शाळा सुरू झाल्या. मात्र, सुरूवाती पासून त्या कमी प्रतिसाद होता. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या एकूण 1 हजार 209 शाळा असून त्यात 2 लाख 84 हजार 354 विद्यार्थी आहेत. यापैकी पहिल्या आठवड्यात 278 शाळा सुरू होऊन 5 हजार 560 विद्यार्थ्यांची उपस्थिती राहिली.

आता चालू आठवड्याच्या आकडेवारीनुसार दोन महिन्यांनंतर 1 हजार 98 शाळा सुरू झाल्या असून त्यात 91 हजार 248 विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. शाळा सुरू होण्याची संख्या वाढली असली तरी त्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढलेली नाही. ही उपस्थिती 35 टक्क्यांच्या आत आहे.

एकीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली असताना हा अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. काही विद्यार्थी आनलाईन, तर काही अॅाफलाईन अशा गोंधळामुळे अभ्यासक्रमावर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.

सध्या शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणातून हवी तशी प्रगती झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता वर्गात शिक्षकांनी पुन्हा अभ्यासक्रमाची उजळणी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे.

सध्या सुरू असलेल्या शाळा- 1098

विद्यार्थ्यांची उपस्थिती- 91248

21 हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

जिल्ह्यात आजही जिल्हा परिषद आणि अन्य सर्व व्यवस्थापनापैकी 21 हजार 474 विद्यार्थी यांना ना ऑनलाईन ना ऑफलाईन असे कोणतेच शिक्षण मिळत नाही. यामुळे हे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून बाजूला फेकल्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे शाळा सुरू करण्याची सर्वच व्यवस्थानापाची शाळा सुरू होणे आवश्यक झाले आहे.