
राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महसूल प्रशासनाने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले वितरणांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. आवश्यक ते दाखले मिळण्यासाठी शाळा स्तरावर मोहीम राबविली जाणार आहे. विशेष करून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आहे. राहाता तालुक्यात या योजनेची अंमलबजावणीचे प्रभावी नियोजन महसूल व पंचायत समितीच्या स्तरावर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ते दाखले मिळण्यासाठी शाळांनी बोनाफाईड अथवा दाखला उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर एका नोडल शिक्षकाची नेमणूक करून त्या शिक्षकाने शाळा ते सेतू असा प्रवास करून दाखले तयार करण्यासाठी द्यावे व तयार झालेले दाखले विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर वितरण करणे, अशी संकल्पना आहे.
राहाता तालुक्यातील शाळा आणि त्यांना जोडलेले सेतू अशी रचना करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांची यामुळे हेळसांड थांबणार आहे. 15 मे ते 15 जून अशी महिनाभर ही योजना सुरू राहणार आहे.
दहावी व बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. या दोन्ही इयत्तांच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सेतू केंद्रात होते. ही गर्दी टाळण्यासाठी, विद्यार्थ्यांना विनासायास दाखले मिळण्यासाठी 15 जून 2023 पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी उपक्रम, मेळावे, मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे. यात महसूल प्रशासनही पुढे सरसावले असून आपले सी. एस. सी. केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व महा ई-सेवा केंद्र (सेतू) यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला आदी दाखले ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याचे प्राधान्य दिले आहे.
महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी विविध दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी होते. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यातून विद्यार्थी, पालक व शासकीय कर्मचारी यांच्यात वादावादी होते. दाखल्यांसाठी अर्ज करताना नागरिकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. तसेच अर्जामध्ये त्रुटी असल्यास पुन्हा कार्यालयात यावे लागते. प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत दाखला मिळाला नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो्. तेव्हा विद्यार्थ्यांच्या निकालाची वाट न पहाता आताच दाखल्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर उपविभागीय कार्यालयांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक व शाळेतील नोडल शिक्षक यांनी आवश्यक ती कागदपत्रे शाळेत जमा करून नियोजन करून दिलेल्या सेतू कार्यालयात,ई सेवा केंद्रात जमा केल्यावर विद्यार्थ्यांना विनासायास दाखले प्राप्त होणार आहेत.पालकांनी स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, विद्यार्थी फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे विनाविलंब शाळेत जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून कमी वेळेत विद्यार्थ्यांना लाभ देता येईल. आपले नियोजन यात मुख्याध्यापक, नोडल शिक्षक व ई सेवा केंद्र चालक यांची सांगड घालून दिलेली आहे.शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख केंद्रस्तर नोडल व संनियंत्रक म्हणून कामकाज करणार आहेत. फक्त पालकांनी सहकार्य करणे खूप गरजेचे आहे.
- राजेश पावसे, गटशिक्षणाधिकारी, राहाता
‘डिजिटल’चाही पर्याय
आपले सरकार या संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. यासाठी अर्जदाराने आपले सरकार संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज ऑनलाईन स्विकारला जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराला ई-मेल द्वारे तसेच या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले विनाविलंब मिळणार आहेत.