विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन !

दररोज शिक्षकांना नोंदवावी लागणार उपस्थिती
विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन !

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांची उपस्थिती दररोज ऑनलाईन स्वरूपात नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई चे प्रकल्प संचालक यांनी उपस्थिती नोंदण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य झाल्याने शिक्षकांच्या आणखी एका कामात नव्याने भर पडली आहे.

शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम, योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर चॅटबॉटच्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे, त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील 1 ली ते इ.10 वीच्या इयतेतील विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि.1 डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे.

या संबंधाने राज्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या चॅटबॉटवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियमितपणे आढावा घेणार आहे. शिक्षकांनी गुगल प्ले स्टोरवरून संबंधित अ‍ॅप डाऊनलोड करावयाचे आहेत.

प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार चॅटबॉटद्वारे इयत्ता 1 ली ते 10 वीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय.डी. चा वापर करावा. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या चॅटबॉटवर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणार्‍या शिक्षकांना चॅटबॉटवर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.

काही शिक्षकांना चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय.डी. चा वापर करून विद्याथ्र्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

चॅटबॉटवर दोन सत्रात भरणार्‍या शाळांसाठी सकाळी 7 ते दु. 12 तर अन्य शाळांसाठी सकाळी 10 ते सायं. 5 या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची यांची दैनंदिन उपस्थिती चॅटबॉटवर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणार्‍या अडचणी लिंकवर नोंदविता येणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com