कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांचे यंत्रणेला आदेश
कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविडचा वाढता संसर्ग आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध आधिक कडक केले आहेत. तसे आदेश लागू केले असून त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी आदेश काढले आहेत. निर्बंधाचे आदेश लागू होताच त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. दरम्यान पोलिसांकडून निर्बंधाची कडक अंमलबजावणी झाली पाहिले यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना तसे आदेश दिले आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील करोना रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. तीन महिन्यापासून शंभरच्या आत असलेली रुग्णसंख्या आठ दिवसांमध्ये वाढली आहे. सोमवारी 244 रुग्णसंख्या होती. मंगळवारी 408 तर बुधवारी 448 रूग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले. रूग्णसंख्या वाढत असताना उपचार सुरू असणार्‍या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोविड वाढत असताना ओमिक्रॉनचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे.

निर्बंध लागू केले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असतानाही अहमदनगर शहरासह जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नाही. लग्न समारंभ, बाजारपेठा यासह सार्वजनिक ठिकाणी नागरिक गर्दी करत आहे. नागरिकांकडून सामाजिक अंतराचे पालन केले जात नाही. मास्कचा वापर केला जात नसल्याने कोविड रुग्णांत वाढ होत आहे.

निर्बंध लागू होताच जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. ज्यांच्याकडून निर्बंधांचे उल्लंघन होईल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत निरीक्षक पथक नेमणूक करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तर दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना हद्दीमध्ये कोविड नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोलिसांनी आपआपल्या हद्दीत नाकाबंदी करून व गस्त घालून निर्बंधाची अंमलजबावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करून विनामास्क कारवाईवर भर दिला आहे. तसेच आस्थापना, बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com