गटार पाणी शुद्धीकरण प्रकल्पावरून संगमनेरात तणाव

प्रकल्पाची जागा बदलण्याची मागणी
गटार पाणी शुद्धीकरण प्रकल्पावरून संगमनेरात तणाव

संगमनेर (शहर प्रतिनिधी)

नाशिक-पुणे महामार्गावरील जोर्वे नाका परिसरातील यंग नॅशनल ग्राउंडवर गटार पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प सुरू होणार असल्याने या परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. काल सायंकाळी या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. प्रकल्पाच्या निषेधार्थ त्यांनी घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जागा मुलांच्या खेळण्यासाठी असल्याने या जागेवर हा प्रकल्प सुरू करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात संगमनेर नगरपालिका ४० लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा करत आहे. नगरपालिकेने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या मैदानाचा उपयोग परिसरातील मुले खेळासाठी करतात. या ठिकाणी दरवर्षी क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. असे असतानाही संगमनेर नगरपालिकेने या मैदानावर गटार पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प मंजूर केला आहे. प्रकल्प याठिकाणी सुरू होणार असल्याने परिसरातील नायकवाड पुरा, लखमी पुरा, रहमत नगर, जोर्वे रोड व परिसरातील उपनगरातील नागरिक संतप्त झाले आहेत. काल सायंकाळी अनेक नागरिक या मैदानावर जमा झाले. प्रकल्प होऊ नये यासाठी त्यांनी घोषणाबाजी केली. नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. .

याप्रसंगी संगमनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख, नगरसेवक नूरमहंमद शेख, वसीम शेख, माजी नगरसेवक शरीफ शेख, शौकत जहागीरदार यांच्यासह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांच्या मुलांसाठी हे एकमेव मैदान आहे. या मैदानाचा वापर फक्त खेळासाठी असावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा प्रकल्प या ठिकाणी सुरु झाल्यास सर्व या प्रभागातील नगरसेवकांनी राजीनामे द्यावे, अशी संतप्त मागणी यावेळी करण्यात आली. संगमनेर नगरपालिकेवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. या प्रभागातील सर्व नगरसेवक त्यांच्याच गटाचे आहेत. त्यामुळे हे नगरसेवक या प्रकल्पास विरोध कसा करणार असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. यंग नॅशनल मैदानावर गटार पाणी शुद्धीकरण प्रकल्प होवू नये याबाबतचे निवेदन स्थानिक रहिवाशांनी २५ ऑगस्ट २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर, संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले होते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com